मातीतले मल्ल आता राजकीय आखाड्यात
By admin | Published: February 17, 2017 10:55 PM2017-02-17T22:55:44+5:302017-02-17T22:55:44+5:30
भुर्इंज गटात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला _- झेडपी दंगल
महेंद्र गायकवाड--पाचवड --भुर्इंज गटात प्रथमच प्रमुख चार पक्षांचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यावेळची भुर्इंज गटातील निवडणूक आमदार मकरंदआबा पाटील व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. आजपर्यंत या दोन्ही नेत्यांनी वाई तालुक्याबरोबरच जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे खोलवर नेऊन जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेची दमछाक करून सोडली होती. परंतु यावेळची राजकीय परिस्थिती बदलली असून, देशातील राजकीय बदलाचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही झाला आहे.दोन्ही नेत्यांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या व दोघांचेही राजकीय होमपीच ठरलेल्या भुर्इंज गटात शिवसेना व भाजपाने याठिकाणी दमदार उमेदवारी देऊन प्रथमच मतविभागणीला पर्याय उभा केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजयी उमेदवार ठरवणारी
ही मतविभागणी कमळ की धनुष्यबाणाकडे जाणार याकडे भुर्इंज गटातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पाचवड व भुर्इंज या वाई तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. निवडणूक रणधुमाळीने सध्या या बाजारपेठांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा कामाला लागली असून, बाजारपेठा वेगवेगळ्या पक्षांच्या पोस्टर्स व फ्लेक्सनी फुलल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी वापरलेल्या नावीन्यपूर्ण प्रचार गीतांमुळे त्या मतदारांचे लक्ष वेधत आहेत. ही निवडणूक कोणासाठी प्रतिष्ठेची तर कोणासाठी अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे.
पैलवान एकमेकांसमोरकिसन वीर कारखान्याचे संचालक व जांबचे पैलवान मधुकर शिंदे यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचाराचा धुरळा उडवला असून, आपल्या उमेदवारांसाठी सर्व प्रकारचे डावपेच ते या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाड्यात खेळणार आहेत. त्यांच्यासोबत चिंधवली गावचे महान महाराष्ट्र केसरी पैलवान माणिक पवार यांनीही राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचारात उडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससाठी भुर्इंजचे पैलवान प्रकाश पावशे यांनी प्रचाराची जबाबदारी घेतली असून, युवा प्रतिष्ठानचे सुधीर भोसले-पाटील यांच्या पत्नी रजनी भोसले-पाटील यांच्या प्रचार यंत्रणेत ते सहभागी आहेत. सर्व पक्षांचा बारकाईने अभ्यास करून नुकतेच कमळ हाती घेतलेले चिंधवलीचे पैलवान जयवंत पवार यांनी भाजपाच्या उमेदवारांसाठी गटातील स्वत:चे कार्यकर्ते कामाला लावले आहेत. मातीच्या कुस्तीत कधीही समोरासमोर न आलेले हे कसलेले मल्ल राजकीय आखाड्यात कुणाला कुठल्या डावावर चितपट करतायत याचीही उत्सुकता भुर्इंज गटात शिगेला पोहोचली आहे.