दोन्ही राजेंचे मावळे भर सभेत भिडले !
By admin | Published: February 9, 2017 11:56 PM2017-02-09T23:56:10+5:302017-02-09T23:56:10+5:30
सातारा पालिका सभा : बहुमत न घेताच विषय मंजूर केल्याचा उदयनराजेंच्या आघाडीवर आरोप; राष्ट्रगीत सुरू असताना गोंधळ
सातारा : मनोमिलन दुभंगल्यानंतर सातारा पालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये दोन्ही राजेंच्या आघाडीच्या नगरसेवकांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत सभेत प्रचंड गोंधळ घातला. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने विषय पत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मताने मंजूर करून ही सभा केवळ एक तासात गुंडाळल्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. एवढेच नव्हे तर सभा संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाही गोंधळ सुरू होता. त्यामुळे हा वाद आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात पोहोचला आहे.
मनोमिलन तुटल्यानंतर सातारा पालिकेची ही सर्वसाधारण सभा गुरुवारी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. भाजपच्या नगरसेवकांसाठीही ही पहिलीच सभा होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे या सभेकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले होते. सभेच्या सुरुवातीलाच सभागृहामध्ये बसण्यावरून मनोमिलन तुटल्याचा विरोधाभास जाणवला. मनोमिलन असताना दोन्ही राजेंचे नगरसेवक एकमेकांशेजारी सभागृहात बसलेले पाहायला मिळत होते. मात्र, या सभेमध्ये तसे दिसले नाही. एका बाजूला सातारा विकास तर दुसऱ्या बाजूला नगरविकास आघाडीचे नगरसेवक बसले होते. भाजपचे नगरसेवक मात्र नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांजवळ बसल्याचे पाहायला मिळाले.
८ सप्टेंबर २०१६ च्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या काही विषयांचा कार्यवृत्तांत कायम करणे, मागासवर्गीय विशेष कल्याण समिती आणि झाडांचे संरक्षण व जतन करण्यासाठी समिती गठीत करणे तसेच शनिवार पेठेतील मटण मार्केटच्या दुरुस्तीसाठी निविदा मंजूर करणे या इनमीन चार विषयांना मंजुरी देण्यासाठी ही सभा बोलविण्यात आली होती. परंतु चार विषयांनीच पालिका प्रशासनाला अक्षरश: घाम फोडला.
प्रशासन अधिकारी प्रोसिडिंग वाचून दाखवत असताना भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी आक्षेप घेतला. पूर्वी झालेल्या सभेमध्ये नेमके विषय काय होते. ते कसे मंजूर केले गेले. त्याच्या निविदा कशा काढल्या गेल्या, याचा सविस्तर खुलासा करावा अशी त्यांनी मागणी केली. त्यानुसार सभागृहात पूर्वी मंजूर झालेले एक-दोन विषय वाचून दाखविले. परंतु त्यानंतर मध्येच विषय बदलून दुसऱ्या विषयांवर चर्चा सुरू झाली. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक दत्ता बनकर आणि सिद्धी पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सभागृहात नवखे नगरसेवक आहेत. मागील सभेचा वृत्तांत आणि सध्या कोणते विषय मंजुरीस घेतले आहेत, हे सर्व नगरसेवकांना समजावून सांगितलं पाहिजे, अशी नगरसेविका सिद्धी पवार यांची मागणी होती.