नोटीस मिळाली नसल्याचे नगराध्यक्षा खोटं सांगतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:21 AM2021-03-30T04:21:33+5:302021-03-30T04:21:33+5:30
कऱ्हाड : जिल्हाधिकारी कार्यालयाने कऱ्हाडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल मागविला असतानाही नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पाबाबत ...
कऱ्हाड : जिल्हाधिकारी कार्यालयाने कऱ्हाडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल मागविला असतानाही नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पाबाबत अहवाल द्यावा अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्या खोट बोलून कऱ्हाडकरांची, पालिकेची व मतदारांची फसवणूक करत आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून खुलासा करावा, असे आव्हान महिला व बाल कल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.
हुलवान यांनी म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयातील पालिका प्रशासकीय अधिकारी अभिजित बापट यांच्याकडे कऱ्हाडच्या अर्थसंकल्पाचा विषय गेला आहे. त्यासंदर्भात नगराध्यक्ष शिंदे यांना अर्थसंकल्पाची सूचना एकमताने मंजूर झाली आहे. तो अर्थसंकल्प मंजूर करावा असे कळवले आहे. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी सूचनेत बदल झालेली उपसूचना मंजूर झाली आहे. तो अर्थसंकल्प मंजूर करावा, असे कळवले आहे. प्रशासकीय अहवालही त्यात प्राप्त झाला आहे. त्या सगळ्याची स्थिती लक्षात घेता त्यावर निर्णय घ्यायचा असल्याने बापट यांनी सगळ्या कागदपत्रांचा एक संच करून त्यावर कऱ्हाडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्याकडे स्वयंस्पष्ट व वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. २२ मार्च रोजी त्या नोटिसा पालिकेत मिळाल्या आहेत. त्यावर तीन दिवसांत अहवाल देणे अपेक्षित आहे. असे स्पष्ट नमूद केले आहे. तरीही नगराध्यक्ष अहवाल देण्यास टाळत आहेत.
नगराध्यक्ष रोहिणी शिंदे त्यांच्या कर्तव्यापासून पळून जात आहेत. त्या नेहमीच पळपुट्या ठरल्या आहेत. २२ मार्चला नोटीस निघाल्याचे समजताच त्या त्याच दिवसापासून आठ दिवस परगावी निघून गेल्या आहेत. काही अंगावर येत आहे, असे वाटले की लगेच हात झटकून जबाबदारी प्रशासनावर ढकलून नगराध्यक्ष शिंदे नामानिराळ्या राहतात, असे हुलवान यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पीय बैठकीत अर्थसंकल्प बहुमताने मंजूर झाल्याचे त्या मान्य करतात. नगर परिषदेच्या मिनीट बुकमध्ये तशी नोंद करून त्या स्वाक्षरीही करतात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना एकमताने मंजूर झाल्याचे खोटे कळवतात. ही त्यांची दुटप्पी व खोटी भूमिका कराडच्या विकासाला व परंपरेला मारक आहे. ती भूमिका कऱ्हाडकर नागरिकांनीही ओळखली आहे. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे नेहमीच तडजोडी करतात. हे साऱ्या कऱ्हाडला परिचयाचे आहेत. वास्तविक अपघाताने मिळालेल्या नगराध्यक्षपदाचा त्यांनी स्वहितासाठी वापर केला आहे. असा आजपर्यंतचा त्यांचा प्रवास सांगतो, असेही त्या म्हणाल्या. नगराध्यक्षपद रोहिणी शिंदे यांना मिळाले. मात्र ते भाजपला काहीच फायद्याचे ठरलेले नाही. त्यामुळे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे पक्षाच्या विश्वासाला पात्र ठरल्या नाहीत. त्या जनतेच्या विश्वासास काय पात्र ठरणार हेच कोडे आहे.