नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा राजीनामा
By admin | Published: October 3, 2015 11:06 PM2015-10-03T23:06:35+5:302015-10-03T23:08:20+5:30
सातारा : विजय बडेकर अन् जयवंत भोसले यांची वर्णी लागणार
सातारा : साताराचे नगराध्यक्ष सचिन सारस व उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता नगराध्यक्षपदावर सातारा विकास आघाडीचे विजय बडेकर तर उपनगराध्यक्षपदासाठी नगर विकास आघाडीचे जयवंत भोसले यांचे नाव निश्चित झाले आहे. पालिकेच्या विशेष सभेत त्यांची निवड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून नगराध्यक्ष सचिन सारस यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दोन्ही आघाड्यांमधून प्रयत्न सुरू झाले होते. दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावर चर्चा केली होती. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सारस यांना राजीनामा देण्यास सांगितले. दोन्ही आघाड्यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ विभागून घेतला होता. नगराध्यक्षांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा पूर्ण झाला मात्र, उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांना पाच महिने दहा दिवसच काम करण्याची संधी मिळाली. ही मुदत संपल्याने शनिवारी दुपारी उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी त्यांचा राजीनामा नगराध्यक्ष सचिन सारस यांच्याकडे दिला. त्यानंतर नगराध्यक्ष सचिन सारस यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे राजीनामा दिला. यावेळी दोन्ही आघाड्यांतील नगरसेवक उपस्थित होते. आता पुढील सव्वा वर्षासाठी सातारा विकास आघाडीचे विजय बडेकर यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीचे जयवंत भोसले यांचे नाव निश्चित झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पालिकेची विशेष सभा बोलावून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)