कऱ्हाडातील गुंडांच्या टोळीवर मोक्काची कारवाई
By संजय पाटील | Published: January 29, 2024 06:59 PM2024-01-29T18:59:45+5:302024-01-29T19:01:22+5:30
विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून प्रस्तावाला मान्यता
कऱ्हाड : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईच्या प्रस्तावाला छाननी पश्चात मान्यता दिल्यानंतर सोमवारी आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोम्या उर्फ सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी (वय ३१), रविराज शिवाजी पळसे (वय २७), आर्यन चंद्रकांत सूर्यवंशी (वय १९, तिघेही रा. हजारमाची-ओगलेवाडी, ता. कऱ्हाड) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील गुंड सोम्या उर्फ सोमनाथ हा ग्रामपंचायत सदस्य असून त्याच्यासह त्याच्या इतर साथीदारांनी परिसरात गत काही महिन्यांपासून दहशत निर्माण केली आहे. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी खंडणीसाठी एकावर प्राणघातक हल्ला केला. कोयता तसेच बियरची बाटली फोडून त्याद्वारे संबंधितावर वार केले. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना टोळीप्रमुख सोम्या उर्फ सोमनाथ सुर्यवंशी हा त्याच्यासह साथीदारांसोबत परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी करीत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, उपनिरीक्षक राजू डांगे, अंमलदार संजय देवकुळे, असिफ जमादार, सागर बर्गे, प्रवीण पवार, कुलदीप कोळी, अमोल देशमुख, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांच्यासह पथकाने संबंधित टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार टोळीवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर तपास करीत आहेत.