ग्रामपंचायतीच्या आवारात ‘चुलीवर जेवण’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:44+5:302021-02-10T04:39:44+5:30
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या गावांमध्ये शामाप्रसाद मुखर्जी ग्रामपरिस्थितीकीय समिती स्थापन केल्यास त्या गावच्या विकासासाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधी त्या ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या गावांमध्ये शामाप्रसाद मुखर्जी ग्रामपरिस्थितीकीय समिती स्थापन केल्यास त्या गावच्या विकासासाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधी त्या गावाला देण्यात येतो. रासाटी गावातही अशा प्रकारची समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या समितीच्या वतीने वनविभागाने अनेक आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली असून, गावातील जनतेवर जाचक निर्बंध लादण्यात येत आहेत. या समितीच्या वतीने गावात सवलतीच्या दरात गॅस देण्यात आले होते. मात्र, अनेक महिन्यांपासून ही योजना बंद असून, याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही योजना तात्काळ सुरू करण्यासाठी रासाटी ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामपंचायत व वनविभागाच्या विरोधात मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या अमिषा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ‘चुलीवरचे जेवण’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रासाटी, आंबेघर, दास्तान, पळ्याचावाडा या गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सवलतीच्या दरातील गॅस योजना ही गरजू जनतेसाठी दिलासादायक आहे. मात्र, कोरोना महामारीच्या कालावधीत निधीच्या कमतरतेचे कारण देत ती बंद करण्यात आली. आतापर्यंत वनविभागाने गावात एकही योजना सक्षमपणे राबविली नाही. गावामध्ये जंगलतोड होऊ नये, प्रदूषण वाढू नये म्हणून लाकूड तोडीला निर्बंध घालत रासाटी गावात सवलतीच्या दरात गॅस योजना राबवली होती. वनविभागाच्या कपाटात गावातील गृह पर्यटनाची प्रकरणे धूळ खात पडली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून वनविभागाने गोरगरिबांच्या हिताची असणारी योजना सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लेक लाडकी अभियानच्या अॅड. शैलजा जाधव, माया जाधव, स्वाती बल्लाळ, पाटण पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, त्रिपुडीचे माजी सरपंच जनार्दन पवार, नवजाचे माजी सरपंच शैलेंद्र शेलार, लक्ष्मण कदम, कोयना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
- कोट
गॅस सवलत व शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतील इतर योजनांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. लवकरच निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. निधी उपलब्ध होताच योजनेअंतर्गत ग्रामस्थांना लाभ मिळेल.
- अमित भोसले
वनसंरक्षक, वन्यजीव हेळवाक
फोटो : ०९केआरडी०९
कॅप्शन : रासाटी, ता. पाटण येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात महिलांनी मंगळवारी ‘चुलीवरचे जेवण’ हे अनोखे आंदोलन केले. (छाया : नीलेश साळुंखे)