विंग येथे कोरोना यंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:01+5:302021-05-28T04:28:01+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे हाॅटस्पॉट बनलेल्या या गावातील ...
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे हाॅटस्पॉट बनलेल्या या गावातील साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनासह ग्रामपंचायत, ग्राम समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या विंग येथे दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढू लागले आहेत. आजमितीस ३३ रूग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी आठ रूग्ण हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. चार कोरोना सेंटरवर तर एकवीस रूग्ण होमआसोलेशन आहेत. आज अखेर १५२ रूग्ण बाधित झाले होते. अकरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक,सेविका, आशा, अंगणवाडी सेविका, कोरोना समितीचे सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्या मदतीने सातत्याने परिश्रम घेत आहेत. गावातून फवारणी घेऊन व निरर्जंतुकीकरण करणे, कोरोना तपासणी करणे, लसीकरण करणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, घराघरात जाऊन मार्गदर्शन करणे या उपाययोजना केल्या जात आहेत. तर वैद्यकीय अधिकारी सुप्रिया बनकर यांनी लोकांनी मास्क, सॅनिटायझर, शासनाच्या नियमाचे पालन करण्याचे तसेच कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.
चौकट :
विद्यालयात विलगीकरण कक्ष
गावात वाढत चाललेली रूग्णसंख्या कमी करण्यासाठी होमआसोलेशन ऐवजी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. मात्र आशा सेविका बाधित आल्याने सध्या कक्ष सुरू नसला तरी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस पाटील रमेश खबाले यांनी सांगितले.