ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
By दीपक देशमुख | Published: August 9, 2023 05:49 PM2023-08-09T17:49:56+5:302023-08-09T17:51:56+5:30
सातारा : सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे मेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांचे रुग्णालय होत आहे. जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...
सातारा : सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे मेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांचे रुग्णालय होत आहे. जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे नावही तेवढेच बुलंद असावे, अशी अपेक्षा होती. त्यावरून बराच ऊहापोह झाला. अखेर राज्य शासनाने या कॉलेजचे नामकरण 'छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालय, सातारा' असे करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
सातारा मेडिकल काॅलेज २०१४ मध्ये मंजूर झाले होते. तथापि, मेडिकल कौन्सिलच्या आणि इतर संस्थांच्या निकषांची पूर्तता करण्यात तसेच जागा उपलब्ध करून घेण्याबाबत बराच कालावधी लोटल्यावर गतवर्षी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. या काॅलेजला स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे सुपुत्र असलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याची विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य शासनास एक वर्षापूर्वी केली होती. तसेच, नुकत्याच देवेंद्र फडणवीस यांच्या कऱ्हाड दौऱ्यातही याबाबत स्वतंत्र प्रस्ताव दिला होता.
त्यानुसार राज्य शासनाने दि. ९ ऑगस्टला मेडिकल कॉलेजचे नामकरण 'छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रुग्णालय, सातारा' करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने पुढील कार्यवाही करावी, असा आदेशही दिला आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा सर्वांनाच अखंड मिळत राहणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाचे जनतेच्या वतीने आणि व्यक्तीश: अभिनंदन करतो. -उदयनराजे भोसले, खासदार