मातृभूमीसाठी मुंबईकरांची कर्मभूमीतून वैद्यकीय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:22+5:302021-04-17T04:39:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली ...

Medical services from Mumbai Karmabhumi for the motherland | मातृभूमीसाठी मुंबईकरांची कर्मभूमीतून वैद्यकीय सेवा

मातृभूमीसाठी मुंबईकरांची कर्मभूमीतून वैद्यकीय सेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पोटापाण्याच्या निमित्ताने महानगरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुंबईकरांनी कोविड काळात आपल्या कर्मभूमीत मातृभूमीच्या लोकांची सेवा बजावली आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना बेड मिळवून देण्यापासून सोबत आलेल्या नातेवाइकांच्या राहण्याची व्यवस्थाही या काळात मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गावाकडे कोणालाही औषधोपचाराच्या अनुषंगाने कोणतीही मदत लागली तर ती करण्यासाठी ही मंडळी आघाडीवर आहेत.

कोरोनाकाळाची सुरुवात झाल्यानंतर गतवर्षी मुंबईकरांनी आपल्या गावाची वाट धरली होती. गावात तीन महिने राहिल्यानंतर येथील परिस्थितीची जाणीव तमाम महानगरांत वास्तव्यास असणाऱ्यांना झाली. परिणामी तीन महिन्यांत गावकऱ्यांकडून मिळालेल्या माणुसकीच्या वागणुकीतून त्यांनाही गावकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची संधीच हवी होती. गेल्या काही दिवसांत साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनसह, प्लाझ्मा आणि अन्य काही औषधे मुंबईत आणि पुण्यात उपलब्ध होत आहेत. याची माहिती असल्याने विविध गावांतील प्रमुख ग्रामस्थांना घेऊन व्हॉटसॲप ग्रुप तयार केले आहेत. गावात ज्यांना कोणाला औषधोपचारासह बेडची गरज आहे, त्यांच्यासाठी मदत उभी करण्याचे काम ही मंडळी आपले दैनंदिन काम सांभाळून करीत आहेत. ज्या गोष्टी साताऱ्यात उपलब्ध होत नाहीत त्या मुंबई आणि पुण्याहून मिळवून देण्यासाठीही ही मंडळी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासू लागल्यानंतर दोन दिवसांनी साताऱ्यातून गाडी मुंबईला जाऊन आवश्‍यक रुग्णांसाठी हे इंजेक्शन आणले जात आहे. रुग्णांचे नातेवाईक या गाडीचा खर्च विभागून करतात, तर गाडी घेऊन आलेल्यांना पॅक जेवण देण्याची जबाबदारी या महानगरांतील सातारकरांनी घेतली आहे.

कोविडने माणसांना माणसांपासून दूर केलं असलं तरीही माणसातील माणुसकी जागृत करण्यासाठीही का काळ उपयुक्त ठरला. कोणी ओळखीचा नसला तरी आपल्या जिल्ह्याचा आहे, म्हणून त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी धावणारी ही मंडळी खरी कोविड योद्धे आहेत. महानगरांमध्ये विस्तीर्ण व्यापात अडकूनही मातृभूमीच्या सेवेसाठी आपले योगदान असावे, ही त्यांची भावना अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

चौकट :

पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावासाठी चक्क बोअर !

जावळी तालुक्यातील भामघर गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचा उपयोग ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासह खर्चासाठीही करतात. काही दिवसांपूर्वी मुंबईकर मंडळी गावात आली असता, त्यांना या पाण्याचा रंग बदललेला दिसला. खात्री करायची म्हणून काहींनी हे पाणी बाटलीतून मुंबईत तपासणीसाठी पाठवलं. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांनी विजय सावले यांच्या पुढाकाराने गावात पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी चक्क बोअर मारून गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निकाली काढला.

कोट :

मातृभूमीच्या संस्कारांमुळेच आम्ही मोठ्या शहरांत जाऊन काम करू शकलो. गेल्या महिन्याभरात जावळीत रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य औषधे उपलब्ध करून देण्यात यश आले. आपल्या भागातील कोणीही आले तरी त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रसंग बाका आहे; पण सर्वांच्या सहकार्यातून गावाकडील आपल्या लोकांची कुठेही हेळसांड होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सेवा पुरविताना आत्मिक समाधान मिळते.

- विजय सावले, भामघर

Web Title: Medical services from Mumbai Karmabhumi for the motherland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.