साताऱ्यात वैद्यकीय कचरा चक्क उघड्यावर टाकला, कठोर कारवाईची पर्यावरणप्रेमींची मागणी
By सचिन काकडे | Published: January 23, 2024 06:40 PM2024-01-23T18:40:17+5:302024-01-23T18:41:54+5:30
सातारा : रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यास बंदी असताना साताऱ्यातील यवतेश्वर घाटात अज्ञातांकडून हा कचरा चक्क रस्त्याकडेला टाकण्यात आला ...
सातारा : रुग्णालयांचा वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यास बंदी असताना साताऱ्यातील यवतेश्वर घाटात अज्ञातांकडून हा कचरा चक्क रस्त्याकडेला टाकण्यात आला आहे. या कचऱ्यामध्ये औषधी, इंजेक्शन व अन्य वस्तू असून, असे कृत्य करणाऱ्यांवर पालिका प्रशासन व प्रदूषण मंडळाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतून दररोज मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा बाहेर पडतो. पालिकेने नेमलेल्या एका खासगी संस्थेकडून हा कचरा संकलित करून त्याची सोनगाव कचरा डेपोतील प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम जबाबदारीने सुरू आहे. तरीदेखील काही अज्ञात व्यक्तींकडून रुग्णालयांमधील कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात डोंगरावरून आलेल्या जलवाहिनीच्या कोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात असा कचरा टाकण्यात आला आहे. या कचऱ्यात औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटे, इंजेक्शन तसेच अन्य वस्तूंचा समावेश आहे.
या परिसरात अनेक जनावरे व भटके श्वान खाद्याच्या शोधार्थ भटकंती करीत असतात. कळत-नकळत या जनावरांकडून वैद्यकीय कचरादेखील धुंडाळला जाऊ शकतो. या कचऱ्यामुळे मुक्या जनावरांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.