मायणीच्या देशमुखांना अटक

By admin | Published: March 8, 2017 11:16 PM2017-03-08T23:16:33+5:302017-03-08T23:16:33+5:30

औरंगाबादमध्ये सात दिवसांची पोलिस कोठडी; एमबीबीएस प्रवेशासाठी ३३ लाखास गंडविल्याचा गुन्हा; एजंटही गजाआड

Meenai Deshmukh arrested | मायणीच्या देशमुखांना अटक

मायणीच्या देशमुखांना अटक

Next



औरंगाबाद : सातारा जिल्ह्यातील मायणीच्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिता-पुत्रांची तब्बल ३३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मायणी येथील संस्थाचालक महादेव रामचंद्र ऊर्फ एम्. आर. देशमुख (वय ५८, रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) आणि एजंट विजय शिवराम नलावडे (रा. केशवनगर, चिंचवड, पुणे) यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली. या दोघांनाही
सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणातील आणखी एक आरोपी डॉ. प्रशांत एन. रानडे (रा. मुंबई) हा पसार आहे. सिडको एन-९, एम-२ येथील सचदेव पवार (नाव बदलले) हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांचा मुलगा सुरेश (नाव बदलले) यास डॉक्टर व्हायचे आहे. गतवर्षी त्यांनी एनईईटी (नीट) ही प्रवेशपूर्व परीक्षा दिली होती. या परीक्षा फॉर्मवर विद्यार्थ्याचे नाव आणि फोन नंबर, पत्ता असतो. याआधारे आरोपी नलावडे याने गतवर्षी १ एप्रिल २०१६ रोजी संपर्क साधून त्यांचे मेडिकल कॉलेज असल्याचे आणि तुमच्या मुलास एमबीबीएस प्रवेश मिळून देतो, असे तक्रारदारास सांगितले. याशिवाय आरोपीने त्यांना छत्तीसगड राज्यात बोलावून घेतले. तेथील एका मेडिकल कॉलेजच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून त्याने तोच या कॉलेजचा मालक असल्याचे सांगितलेएवढेच नव्हे तर त्याने तेथे पवार यांच्या मुलास एमबीबीएस प्रथम वर्षात प्रवेश देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून डोनेशन आणि फीसच्या नावाखाली तब्बल २१ लाख २० हजार रुपये घेतले. त्या कॉलेजच्या प्रवेश यादीत तक्रारदाराच्या मुलाचे नाव नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी नलावडेशी संपर्क साधला असता त्याने अखिल भारतीय स्तरावरील मेरिट वाढल्याने तुमच्या मुलाचे अ‍ॅडमिशन रद्द झाल्याचे कळविले. त्यानंतर त्याने मायणी येथे त्याचे दुसरे मेडिकल कॉलेज असून, तेथे आरोपी देशमुख यास भेटण्याचे सांगितले. आरोपीच्या सांगण्यानुसार तक्रारदार मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये आरोपी देशमुख यास भेटले. तेथे देशमुख यानेही त्यांना तक्रारदाराच्या मुलास प्रवेश देण्याची ग्वाही देऊन प्रवेश प्रक्रियेसाठी ६ लाख ८७ हजार रुपये डी. डी. स्वरुपात आणि १५ लाख ४८ हजार रुपये आरटीजीएस पद्धतीने स्वीकारले. यावेळी आरोपींनी विश्वास बसावा म्हणून तक्रारदारास धनादेश दिले होते. तेथेही पवार यांच्या मुलास प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली.
जिवे मारण्याच्या धमक्या
आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला असता काही रक्कम त्यांनी दिली. त्यांच्याकडे अद्यापही ३३ लाख ३० हजार रुपये आहेत. या रकमेची मागणी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या मुलाला उचलून नेईन, अशी धमकी दिली. या धमकीने घाबरलेल्या तक्रारदाराने शेवटी पोलिस आयुक्तांकडे धाव घेऊन या प्रकाराची माहिती दिली. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून गुन्हे शाखेकडे तपास सोपविला.
नीट परीक्षेतही
करायचे सेटिंग?
आरोपी हे नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळवून त्यांचा मेडिकल प्रवेश निश्चित करण्यासाठी देशात रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे रॅकेट लाखो रुपये घेऊन नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटरपर्यंत ते सेटिंग करतात. परीक्षेत उत्तम गुण मिळण्यासाठी त्या सेंटरमधील तज्ज्ञांच्या माध्यमातून परीक्षेची उत्तरे अचूक नोंदविण्यासाठी हे रॅकेट काम करते. परिणामी निकालात अपेक्षित गुण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर होतो. हा प्रकार ऐकून पोलिस थक्क झाले.
उपोषणाचा
४७ वा दिवस!
मायणीतील आयएमएसआर मेडिकल कॉलेजच्या २०१४-१५ बॅचमधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने संबंधितांचे गेल्या ४७ दिवसांपासून चक्री उपोषण सुरूच आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला गेला नसल्याने पुढील प्रवेश घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार व विनंत्या करूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी चक्री उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

Web Title: Meenai Deshmukh arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.