छेडछाड करणाऱ्यांचा ‘मीटर डाऊन’
By admin | Published: January 30, 2015 10:14 PM2015-01-30T22:14:56+5:302015-01-30T22:15:48+5:30
रिक्षाचालक सरसावले : प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची ‘लक्ष्मी’ -- लोकमत इनिशिएटिव्ह
सातारा : महिला व युवतींची तसेच प्रवाशांची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शहरातील रिक्षाचालक महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरसावले आहेत. रात्री-अपरात्री महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून प्रत्येक रिक्षाचालकाच्या गाडीचा नंबर लिहून ठेवला जाता आहे. काही महिन्यांपूर्वी सातारा बसस्थानकातून एका युवतीला मुंबई येथे सोडतो, असे आमिष दाखवून एका जीप चालकाने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून महिला कशा असुरक्षित आहेत, याची भीषणता मांडली होती. या दोन्ही घटनांचा विचार करून रिक्षाचालकांनी महिलांची सुरक्षितता हीच आपली ‘लक्ष्मी’ असल्याचे स्वत:ला मनोमन पटवून घेतले आहे. रात्री-अपरात्री बसस्थानकात एखादी महिला प्रवासी आल्यास ज्या रिक्षामध्ये ती महिला बसेल, त्या रिक्षाचा नंबर वहीमध्ये नोंद केला जातो. यदाकदाचित रिक्षाचालकाला वेळ झाल्यास इतर रिक्षाचालकही त्या चालकाला पाहायला जातात. त्यामुळे आता महिलांकडे पाहण्याची हिंमत कोणाची होणार नाही. (प्रतिनिधी)
आम्ही पैसेही घेत नाही
रात्री-अपरात्री एखादी महिला बसस्थानक परिसरात आल्यास काहीवेळेस तिच्याकडे पैसे नसतात; मात्र माणुसकीच्या भावनेतून अशा महिलांकडून पैसे कधीही घेत नाही. विशेषत: रात्री अचानक एखादा रुग्ण गंभीर आजारी असल्यास नातेवाईक घाईगडबडीत रिक्षाकडे धाव घेतात. त्यांच्याकडे पैसेही नसतात. मात्र, आम्ही त्यावेळी पैशाचा विचार करत नाही. माणुसकी महत्त्वाची आहे. विनाकारण रिक्षाचालकांविषयी गैरसमज पसरविले जातात, अशा काही रिक्षाचालकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
रस्त्यामध्ये एखाद्या महिलेची छेड काढल्याचे यापुढे दिसल्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; परंतु महिलांनीही रात्री बाहेर फिरताना शक्यतो नातेवाईक सोबत असावेत, याची काळजी घ्यावी.
-संतोष माने , सदर बझार (रिक्षाचालक)