पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलक-अधिकाऱ्यांत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:45 AM2021-09-14T04:45:39+5:302021-09-14T04:45:39+5:30

कऱ्हाड : टेंभू प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी शेतकरी नेते सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली टेंभू धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा ...

Meeting between protesters-officers mediated by police inspectors | पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलक-अधिकाऱ्यांत बैठक

पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलक-अधिकाऱ्यांत बैठक

Next

कऱ्हाड : टेंभू प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी सोमवारी शेतकरी नेते सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली टेंभू धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आंदोलक व टेंभू व्यवस्थापन अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी करून बैठक आयोजित केली होती. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते टळले आहे.

बैठकीत टेंभू उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सैदापूर येथील बाधित जमिनीच्या संयुक्त मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीची रक्कम वर्ग केल्याचे पत्र दिले. तसेच मलकापूर येथील शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्याची मुदत मागितली.

गोवारे येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रेडियार यांनी आपण जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांना पत्र दिले असून, त्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडे जुन्या प्रस्तावात ते क्षेत्र का आले नाही याची माहिती घ्यावी असे कळवले असल्याचे सांगितले. गोवारे येथील शेतकऱ्यांनी मोजणीबाबत २०११ मध्येच हरकत घेतली असून, तत्कालीन प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यावेळचे टेंभूचे कार्यकारी अभियंता यांना तो गट बाधित होत असून, प्रस्ताव तयार करण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या, असे शेतकऱ्यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी सचिन नलवडे यांनी गोवारे येथील शेतकऱ्यांची जमीन प्रत्यक्ष बाधित होत असल्याने आपल्या कार्यालयाने २०१४ मध्ये संयुक्त मोजणी करून मूल्यांकन प्रस्ताव जिल्ह्याधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याची कागदपत्रे सादर केले.

दरम्यान, आपण २२ सप्टेंबरपर्यंत यासंबंधी योग्य तो निर्णय घेऊन गोवारे येथील शेतकऱ्यांना एकतर मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अथवा धरणाचे पाणी सोडून शेतकऱ्यांची जमीन मोकळी करावी, अशी मागणी केली. अन्यथा पंधरा दिवसांनी आम्ही पुन्हा सर्व शेतकरी जलसमाधी घेऊ, असा इशारा नलवडे यांनी दिला.

यावेळी पोलीस निरीक्षक खोबरे यांनी मध्यस्थी केल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी शेतकरी नेते सचिन नलवडे, शिवाजी पाटील, योगेश झांबरे, राजू पाटील, विजय पाटील, राजेंद्र पोळ, राहुल पोळ, प्रफुल्ल कांबळे व गोवारे, मलकापूर, सैदापूर येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

फोटो

कऱ्हाड येथे टेंभू प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत सचिन नलवडे यांनी चर्चा केली. यावेळी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे उपस्थित होते.

Web Title: Meeting between protesters-officers mediated by police inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.