‘कृष्णा’ कारखान्याची सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:07+5:302021-03-27T04:41:07+5:30
कऱ्हाड : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार ...
कऱ्हाड : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या आदेशानुसार योग्य ती खबरदारी घेत, ऑनलाईन पद्धतीने ही सभा घेण्यात आली.
कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, गुणवंत पाटील, निवास पाटील, संजय पाटील, सुजित मोरे, गिरीश पाटील, ब्रिजराज मोहिते, जयश्री पाटील, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, दिलीप पाटील, अविनाश मोहिते, अशोक जगताप, पांडुरंग मोहिते, सुभाष पाटील, शिवाजी आवळे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदींसह मान्यवर व सभासद शेतकरी उपस्थित होते.
डॉ. भोसले सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले, ‘कृष्णा कारखान्यातील मशिनरी फार जुनी असल्याने, आम्ही त्याचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय दोन-तीन वर्षांपूर्वी घेतला. ज्यामुळे गाळप आणि साखर उताऱ्यात मोठी वाढ झाली. याचबरोबर कारखाना आधुनिकीकरणासाठी जेवढा खर्च झाला, तेवढे अधिक उत्पन्न कारखान्यास एका वर्षात मिळाले. त्यामुळे आधुनिकीकरणाचा कारखान्याला मोठा फायदा झाला. मे २०१५ मध्ये डिस्टिलरी बंदची नोटीस जारी झाली. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा डिस्टिलरी बंद करण्याबाबतची नोटीस लागली होती. अखेर सर्व बाबींची पूर्तता करत, नोव्हेंबर उजाडला. मुळात आपली डिस्टिलरी १९८० सालची आहे. तिचेही नवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिकीकरण केले. या आधुनिकीकरणामुळे २०१९-२० या काळात डिस्टिलरीतून ३० कोटी ७५ लाखांचा नफा कारखान्यास प्राप्त झाला असून, हा डिस्टिलरीच्या इतिहासातील सर्वाधिक नफा आहे. जो आमच्या काळात प्राप्त झाला. या वर्षात हा नफा ४० कोटी रुपयांपर्यंत होऊ शकेल.
आज देशात साखर उद्योगासमोर मोठ्या अडचणी आहेत. वाढलेल्या उत्पादनामुळे साखर विक्रीच्या समस्येने देशभरातील साखर कारखाने ग्रस्त आहेत. अशावेळी इथेनॉलच्या निर्मितीला प्राधान्य देण्याचे धोरण आम्ही स्वीकारले असून, येत्या काळात थेट रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा कारखान्याचा मानस आहे. कारखान्याच्या साखरेची प्रत उत्तम आहे. कच्च्या साखरेला परदेशात मोठी मागणी आहे. ज्या शेतकऱ्यांकडून तोडणीसाठी मजुरांकडून अतिरिक्त पैसे घेतले आहेत, त्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांचे पैसे पुन्हा परत केले आहेत. येथून पुढेही शेतकऱ्यांची तक्रार आल्यास त्यांचेही पैसे परत केले जातील. कामगारांच्या बाबतीतही सकारात्मक धोरण घेत, तीनदा पगारवाढ देण्यात आली आहे. तसेच ग्रॅच्युईटीपोटी १३ कोटी ४७ लाख रुपये गेल्या पाच वर्षांत अदा करण्यात आले आहेत.’
कारखान्याच्या जलसिंचन योजनांमध्ये मोठी सुधारणा झाली असून, त्या चांगल्या पद्धतीने चालविल्या जात आहेत. सहकार कायद्यातील घटनादुरुस्तीनुसार क्रियाशील व अक्रियाशील सभासद असे वर्गीकरण केले जाते. काही जणांनी ८३ च्या चौकशीसह अन्य प्रश्न उपस्थित केले आहेत, जे मुळात न्यायप्रवीष्ट असल्याने त्याबाबत भाष्य करणे बरोबर नसल्याचे डॉ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी नोटिसीचे वाचन केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.
चौकट
इतिहासात डिस्टिलरीला सर्वाधिक नफा
डिस्टिलरीबाबत बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘चांगल्या उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून डिस्टिलरीचे आधुनिकीकरण केले गेले. या आधुनिकीकरणामुळे २०१९-२० या काळात डिस्टिलरीतून ३० कोटी ७५ लाखांचा नफा कारखान्यास प्राप्त झाला. हा डिस्टिलरीच्या इतिहासातील सर्वाधिक नफा आहे; जो आमच्या काळात प्राप्त झाला.’
फोटो ओळी :
रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.