कोयना धरणग्रस्तांबाबत महिनाभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, आंदोलन स्थगित करा; शंभूराज देसाईंचे आवाहन 

By दीपक देशमुख | Published: March 27, 2023 06:03 PM2023-03-27T18:03:04+5:302023-03-27T18:04:50+5:30

इतर सर्व जिल्हाधिकारी यांच्याशीही करणार चर्चा

Meeting with Chief Minister regarding Koyna Dam victims within a month, Minister Shambhuraj Desai gave the information | कोयना धरणग्रस्तांबाबत महिनाभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, आंदोलन स्थगित करा; शंभूराज देसाईंचे आवाहन 

कोयना धरणग्रस्तांबाबत महिनाभरात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, आंदोलन स्थगित करा; शंभूराज देसाईंचे आवाहन 

googlenewsNext

सातारा : कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महिन्यात बैठक लावणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या प्रश्नाबाबत सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले. याविषयी कोयनानगर येथे आंदोलक व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी देसाई बोलत होते.

बैठकीस श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसीलदार रमेश जाधव, पुनर्वसनचे तहसीलदार विवेक जाधव, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर व कायमस्वरूपी सोडवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी साचेबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे. ज्या धरणग्रस्तांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही, त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

फक्त खातेदार यांनी केलेलेच अर्ज घ्यावेत, अशा सूचना देऊन पालकमंत्री देसाई म्हणाले की, कोणत्या गावात पुनर्वसन योग्य जमीन आहे, त्याची यादी तलाठी सजा, ग्रामपंचायत येथे उपलब्ध करावी. लाभ द्यावयाच्या धरणग्रस्तांची यादी लवकरात लवकर पूर्ण करावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने युद्धपातळीवर हे काम पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आंदोलनकर्त्यांशी संवाद

बैठकीतनंतर पालकमंत्री देसाई यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी एक महिन्याच्या आत बैठक बोलावण्याबाबतचे पत्रही पालकमंत्री देसाई यांनी दिले व आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. त्यास आंदोलनाचे नेते पाटणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उद्या आंदोलन स्थगित करणार असल्याचे सांगितले.

इतर सर्व जिल्हाधिकारी यांच्याशीही करणार चर्चा

कोयना धरणग्रस्तांचे सातारासह आणखी पाच जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने माहिती मागवण्यात येत आहे. तसेच याबाबत त्यांच्याशी चर्चाही करणार असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी सांगितले. उच्चस्तरीय समितीची बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Meeting with Chief Minister regarding Koyna Dam victims within a month, Minister Shambhuraj Desai gave the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.