महामार्गावर पुन्हा ‘मेगा ब्लॉक’
By admin | Published: October 26, 2014 09:34 PM2014-10-26T21:34:08+5:302014-10-26T22:36:53+5:30
वडापचा फटका : कोल्हापूर नाक्यावर प्रवाशांची गर्दी, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
कऱ्हाड/मलकापूर : कऱ्हाडात यायचं, तर कोल्हापूर नाका चुकवून चालत नाही आणि कोल्हापूर नाक्यावर जायचं, तर वाहतूक कोंडीत अडकण्याशिवाय गत्यंतर नाही. गत काही महिन्यांपासूनच हे समीकरण. शहराच प्रवेशद्वार असणाऱ्या कोल्हापूर नाक्याला वडापवाल्यांनी घेरलंय. मात्र, या परिस्थितीकडे पाहायला पोलिसांना वेळच मिळत नाही, हे दुर्दैव. रविवारीही वडापचा मोठा फटका बसला. वडाप वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊन तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
दिवाळी संपली आणि त्याबरोबरच मुलांच्या, नोकरदारांच्या सुट्याही. उद्या सुटीनंतरचा पहिला सोमवार. त्यामुळे पहिल्याच दिवशी कामावर मुंबईकडे जाण्यासाठी सर्वांचीच घाई सुरू होती़ मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या विचारात घेता रविवारी मात्र वाहने अपुरी पडत होती़ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रवाशांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती़ कोल्हापूर नाका परिसरातही सकाळपासून शेकडो चाकरमान्यांनी गर्दी केली होती़ दुपारी दोनपासून महामार्गावर प्रवाशांची वाहन मिळविण्यासाठी गडबड सुरू झाली़ त्यामुळे प्रवासी मिळविण्यासाठी वडाप व्यावसायिकांसह खासगी बसवालेही धावले. वडाप व खासगी बसचालकांनी आपली वाहने महामार्गावरच थांबविली. परिणामी, अस्ताव्यस्त पार्किंग होऊन वाहने अडकली. वाहनांची गर्दी होऊन कोल्हापूर ते सातारा लेनवर कोंडी निर्माण झाली़ प्रवासी घेण्यासाठी काही वाहनांनी महामार्गावर ठिय्या मांडल्यामुळे शहरातून बाहेर पडणाऱ्या व उपमार्गावरून शहरात जाणाऱ्या वाहनांना रस्ताच बंद झाला़ रस्ता काढण्याच्या प्रयत्नात आडवी वाहने घुसविल्यामुळे बराच गोंधळ उडाला. वाहनांच्या पाच किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या़
कोंडी झाल्यानंतर बराच वेळ एकही पोलीस फिरकला नाही. मात्र, वाहने पुढे सरकणे बंदच झाले, त्यावेळी काही आले. त्यांनी कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न चालवले. मात्र, दुपारी दोन पासून रात्री सातपर्यंत कोंडी फोडण्यात यश आले नव्हते. कोंडी वाढतच असल्याने रात्री आणखी पोलीस कर्मचारी त्याठिकाणी तैनात करण्यात आले. (प्रतिनिधी)