सदस्य-अधिकाऱ्यांत ठरावावरून खडाजंगी
By admin | Published: January 30, 2015 10:22 PM2015-01-30T22:22:10+5:302015-01-30T23:19:45+5:30
कऱ्हाड पंचायत समिती सभा : विकासकामांवरून सदस्य आक्रमक; वीज विभागावर ताशेरे
कऱ्हाड : विकासकामांच्या मंजुरीचे ठराव सभेत करूनही ठरावाप्रमाणे कामे होत नसतील तर ठराव कशासाठी करायचे, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वच सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ ठराव करूनही अधिकारी वर्षभर कामे करीत नसतील तर ठरावच करू नये, अशी भूमिका घेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते़ उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते़ या सभेदरम्यान सदस्या अनिता निकम, रूपाली यादव व ज्योती गुरव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ कृषी विभागाच्या आढाव्यावेळी सदस्य दयानंद पाटील व भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना योजनांविषयी विचारणा केली़ विभागाकडून योजना, प्रस्ताव कधी मागविण्यात येतात याची माहिती अधिकारी सदस्यांना देत नसल्याचे त्यांनी सांगितले़ अजय शिरवाडकर यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी प्रत्येक प्रभाग मिटींगला गैरहजर राहत असल्याची तक्रार केली.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातर्फे अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला. तालुक्यात उत्तरमध्ये २१४ व दक्षिणमध्ये २२३ तीव्र कुपोषित बालके असल्याची माहिती त्यांनी दिली. सभापती देवराज पाटील यांनी त्या भागात शिबिर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या़ तालुक्यात पेयजल योजनेची ६० कामे मंजूर असून त्यापैकी १० कामे पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ त्यावर अजय शिरवाडकर व भाऊसाहेब चव्हाण यांनी गावातील हातपंप मोडकळीस आले असून काहींच्या फुटलेल्या पाईप बसविण्यात आल्या नसल्याचे सांगितले़ बांधकाम विभागाच्या आढाव्यावर भाऊसाहेब चव्हाण म्हणाले, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर वचकच राहिला नाही़ शासकीय विभागाकडून झालेल्या विकासकामांचे फलक लावले जात नाहीत़ त्यामुळे शासकीय कामे केल्यानंतर शासनाचे बोर्ड उभारावेत, अशा सूचना सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या़ (प्रतिनिधी)
दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांविषयी संताप...
पंचायत समितीच्या सभेस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांची विचारणा संबंधित विभागांतील इतर अधिकाऱ्यांकडे सदस्यांनी केली़ त्यावेळी मिटींगला गेलेत असे जो-तो अधिकारी सदस्यांना सांगत होता़ ‘तुमचं हे नेहमीचं असतं. प्रत्येकवेळी अधिकारी गैरहजर राहतात. अधिकारीच हजर राहत नसतील तर विचारणा कुणाकडे करायची,’ असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी संताप व्यक्त केला.