सभासद घरात, उमेदवार दारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:44+5:302021-06-09T04:48:44+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑगस्टअखेर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मात्र कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा बिगुल ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑगस्टअखेर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मात्र कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. पण सभासदांना आणि इथल्या लोकांना निवडणूक आहे असं बिलकुल वाटत नाही. कारण निवडणुकीचा माहोलच अजून कुठे दिसत नाही.
यापूर्वीच्या ''कृष्णा'' च्या निवडणुका लोकांनी पाहिलेल्या आहेत. त्यातला प्रचाराचा दणका अनुभवला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ऐकलेल्या आहेत. गावोगावी लागणाऱ्या झेंड्यांची गर्दी, कानठळ्या बसवणारी घोषणाबाजी बघितली आहे. यंदा मात्र अजून यातलं काहीच; कुठेच दिसत नाही.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांना परवानगी नाही. त्यामुळे सभांचा पत्ताच नाही. वक्ते नाहीत आणि श्रोतेही दिसत नाहीत. सभासद घरातून बाहेर पडताना कमी दिसतोय; त्यामुळे प्रत्यक्ष मतदार भेटीशिवाय उमेदवारांसमोर पर्याय सध्या तरी दिसत नाही. त्यामुळेच ''सभासद घरात, उमेदवार दारात'' अशीच काहीशी स्थिती सध्या तरी पाहायला मिळत आहे.
पण कृष्णाचे सभासद ४० हजारांवर आहेत. सहा गटात जरी हे मतदार विखुरले असले तरी या मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे काम नाही. उमेदवारांसाठी ते खूपच कठीण आहे. प्रचारासाठी उरलेले दिवस जर तुम्ही पाहिले तर ''रात्र थोडी सोंगे फार'' अशीच त्यांची अवस्था होणार आहे. त्यातूनही सभासद भेट दौरा झाला तरी फक्त नमस्कार चमत्कार करून उपयोग तो काय? उमेदवाराची, पॅनेलची भूमिका ते नेमके कसे विशद करणार? हा मोठाच प्रश्न आहे.
कोरोनामुळे सध्या मास्क सक्तीचा होऊन बसलाय. त्यामुळे भेटूनसुद्धा ''उमेदवारांना मतदार आणि मतदारांना उमेदवार'' समजेना झालाय. त्यामुळे त्याच्या मताचा अंदाज समजणे तर दूरच. तरीही कृष्णाकाठी सध्या प्रचार सुरू आहे बरं ...
प्रमोद सुकरे, कराड