'कराडची अस्मिता' सभासदांनी जपली! सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत नेमके काय घडले?
By प्रमोद सुकरे | Updated: April 14, 2025 16:48 IST2025-04-14T16:48:25+5:302025-04-14T16:48:58+5:30
घडतंय बिघडतंय : पण त्यांचे काय झाले? ज्यांनी काढली होती खपली

'कराडची अस्मिता' सभासदांनी जपली! सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत नेमके काय घडले?
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराडसह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कराडच्या अस्मितेचा विषय चांगलाच गाजला.कराडची खासदारकी,आमदारकी गेली आता कारखाना तरी राखा असे भावनिक आवाहन सत्ताधाऱ्यांच्या प्रचारातून झाले. मतदारांनीही 'कराडची अस्मिता' जपली.सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पनेललाच पुन्हा संधी दिली.पण कारखान्याचा कारभार मत्त्यापूर मधून चालू देणार नाही अशी टिका करीत 'कराडची अस्मिता' जपण्याचे आवाहन करीत खपली काढणार्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या पनेलला कराड तालुक्यातील मतदारांनीच मोठ्या प्रमाणात नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
सह्याद्रीच्या निवडणूकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे व ऍड.उदयसिंह पाटील यांचे एक तर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांचे दुसरे पनेल अशी तिरंगी लढत झाली.'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' याप्रमाणे सत्ताधारी बाळासाहेब पाटील गटानेच निकालात बाजी मारली. पण प्रचारात कराडच्या अस्मितेचा विषय सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त विरोधी निवास थोरात, रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलने लावून धरला होता.पण ही खपली काढणाऱ्या तिसऱ्या पॅनेलला कराड तालुक्यातील मतदारांनी नेमका कसा प्रतिसाद दिला? हे अंदाजे पाहणे महत्वाचे आहे.
कराड दक्षिणमध्ये काय घडले..
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावात ६,१४१ सभासद मतदार आहेत. पैकी ४८२४ मतदारांनी मतदान केले . त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला २,८४५,आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला १,६२२ तर निवास थोरात यांच्या पनेलला अवघी ३०६ मते मिळाली आहेत.
कराड उत्तर मध्ये काय घडले ..
उत्तर विधानसभा मतदारसंघात असलेल्या कराड तालुक्यातील गावात सह्याद्रीचे १६,३४१ मतदार आहेत.पैकी १३ हजार ३४७ मतदारांनी मतदान केले. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला ८,०११, आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला ३,८४१, तर निवास थोरात व रामकृष्ण वेताळ यांच्या पनेलला अवघी १,३१६ मते मिळाली.
'कडेगाव'करांची 'बाळासाहेबां'चीच कड ..
कडेगाव तालुक्यात सह्याद्रीचे १,५७६ मतदार आहेत. पैकी १,३४२ मतदारांनी हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला १,०२१, आमदार मनोज घोरपडे यांच्या पनेलला २६९ तर निवास थोरात यांच्या पनेलला ३५ मते पडली आहेत.
सातारा तालुक्यात घोरपडे पुढे ..
कराड उत्तरेतील सातारा तालुक्यातील गावात१,५५९ सभासद मतदार आहेत. पैकी १२८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला ५६७,आमदार मनोज घोरपडे यांच्या पनेलला ६८० तर निवास थोरात यांच्या पनेलला २८ मते मिळाली आहेत.
खटावात 'धैर्यशीलां'चे 'कदम' मागे ..
खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद मतदार संघात १,१०१ सभासद मतदार आहेत. पैकी ८६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटलांच्या पनेलला ५६६, आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला २४२ तर निवास थोरात व भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्या पनेलला ९६ मते मिळाली. धैर्यशील कदम यांचा मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो.पण त्यांना येथे अपेक्षित मते घेता आलेली नाहीत.याशिवाय उत्तर विधानसभा मतदारसंघात नसणार्या खटाव तालुक्यातील अन्य गावात सह्याद्रीचे ६७४ सभासद मतदार आहेत. पैकी ५०२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला ३१५, आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला १३६ तर निवास थोरात यांच्या तिसऱ्या पनेलला ४५ मते मिळाली.
कोरेगावात ज्येष्ठ नेत्यांची जादू दिसली नाही ..
कोरेगाव तालुक्यात सह्याद्री कारखान्याचे ४,८१३ सभासद आहेत. पैकी ३,९१६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला २२७५ मते मिळाली.आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला १,१८१ मते तर निवास थोरात यांच्या पनेलला ४४४ मते मिळाली. निवास थोरात यांच्या पनेलला या भागातील ज्येष्ठ नेते भीमराव पाटील व संपतराव माने यांचा पाठिंबा होता. मात्र त्यांची जादू मताच्या रुपाने दिसली नाही अशी चर्चा आहे.