सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या ‘भागीभोगट’वृत्तींना सभासद धडा शिकवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:47+5:302021-06-10T04:26:47+5:30

कऱ्हाड : कृष्णा कारखाना ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे. पण या संस्थेचे वाटे करायला निघालेले ...

Members will teach a lesson to the ‘Bhagibhogat’ attitudes that come together for power | सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या ‘भागीभोगट’वृत्तींना सभासद धडा शिकवतील

सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या ‘भागीभोगट’वृत्तींना सभासद धडा शिकवतील

Next

कऱ्हाड : कृष्णा कारखाना ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था आहे. पण या संस्थेचे वाटे करायला निघालेले ‘भागीभोगट’ गेल्या ३-४ महिन्यांपासून सत्तेसाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता या एकत्रीकरणाच्या प्रयत्नातून बड्या नेत्यांनी हात काढून घेतले आहेत. पण यानिमित्ताने स्वार्थासाठी एकटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘भागीभोगट’ वृत्तींचे कुटिल हेतू समोर आले असून, अशा वृत्तींना येत्या निवडणुकीत कृष्णा कारखान्याचे सभासद चांगलाच धडा शिकवतील, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी केले.

यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील रेठरे बुद्रुक-शेणोली गटातील उमेदवार व सहकार पॅनलचे नेते डॉ. सुरेश भोसले व बाजीराव निकम यांच्या प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांच्या हस्ते रेठरे बुद्रूक येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी डाॅ सुरेश भोसले, डाॅ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहिते म्हणाले, गेल्या ६ वर्षात डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे. ही धमक फक्त सुरेश भोसलेंच्याकडेच असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली कारखाना आणखी प्रगती करेल याचा ठाम विश्वास असल्यानेच मी सहकार पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मी सहकारातील सर्व पदांवर काम केले आहे. दोनवेळा अध्यक्ष झालो आहे. त्याच्यापुढील वेळी एकाला निवडून आणून अध्यक्ष केले आहे. त्यामुळे मला आता सत्तेची आवश्यकता नाही. पण काही लोक आता आमच्यात लावालावी करण्याचा उद्योग करतील. ‘दादांनी असं सांगितलंय’ म्हणून अफवा पसरवतील. पण कुठल्याही अफवांना बळी न पडता सभासदांनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन मदनराव मोहिते यांनी केले.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या ६ वर्षात आम्ही शेतकऱ्यांना सरासरी ३००० रुपयांहून अधिक ऊसदर दिला. ६ वर्षे ६० किलो मोफत साखर दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी जयवंत आदर्श ऊसविकास योजना राबविली. याऊलट विरोधकांच्या कामगिरीचा आढावा घ्यायचा झाला, तर एकाने त्याच्या काळात इतके घोटाळे केले की त्यातून ते बाहेर पडू शकलेले नाहीत. तर दुसरे गृहस्थ सत्तेवर आले तर सभासदांना वेळेवर बिले मिळतील की नाही याबद्दल शंकाच आहे. अशावेळी आम्ही पारदर्शकपणे व प्रामाणिकपणे केलेले काम आपल्यासमोर आहे. या कामाला पाठबळ देण्यासाठी आपण सर्वांनी खंबीरपणे सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे.

यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्यामबाला घोरपडे, सरपंच सुवर्णा कापूरकर, विकास सोसायटीचे अध्यक्ष व्ही.के. मोहिते यांच्यासह मान्यवर नेते व सहकार पॅनलचे कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.

फोटो ओळी :

रेठरे बुद्रूक, ता. कराड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते. सोबत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, बाजीराव निकम व अन्य मान्यवर.

Web Title: Members will teach a lesson to the ‘Bhagibhogat’ attitudes that come together for power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.