जिल्हा परिषदेच्या आवारात उभे राहणार यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक सभागृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:55+5:302021-05-28T04:28:55+5:30
सातारा : येथील जिल्हा परिषदेच्या आवारात आता महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक सभागृह उभे राहणार आहे. यासाठी ७ ...
सातारा : येथील जिल्हा परिषदेच्या आवारात आता महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक सभागृह उभे राहणार आहे. यासाठी ७ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. अध्यक्ष उदय कबुले यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला असून, या स्मारकात कलादालन, संग्रहालय, वाचनालय, आदींचा समावेश असणार आहे.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष उदय कबुले यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, आदी उपस्थित होते.
अध्यक्ष कबुले म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या पाठीमागील बाजूला दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह आहे. या सभागृहाच्या बाजूला यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक सभागृह होणार आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता. हा निधी २०१९पर्यंत खर्च करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, निधी खर्च झाला नाही. त्यामुळे शिल्लक निधी शासन मान्यतेशिवाय खर्च करता येत नव्हता. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकासाठीच्या अखर्चित निधीबद्दल निवेदन दिले होते. तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७ कोटी ६९ लाख २० हजारांचा निधी मंजूर केला आहे. एका स्वतंत्र आदेशान्वये हा निधी वितरीत करण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने कळविले आहे. त्यामुळे आता या स्मारक सभागृहाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
कोट :
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाशेजारीच हे स्मारक सभागृह आकर्षक पद्धतीने उभे राहणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये हे स्मारक सभागृह उभे राहत आहे, याचा विशेष आनंद आणि अभिमान आहे.
- उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद
.................................
दोन मजली स्मारकात हे असणार...
यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक सभागृह उभे राहणार आहे. यात तळमजल्यासह वर दोन मजले असणार आहेत. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा काटेकोर नियोजन करत आहे. संग्रहालय, कलादालन, प्रदर्शन दालन, वाचनालय, मिटींग हॉल, विश्रामगृह यासोबतच परिसर सुशोभिकरण, विद्युतीकरण, वातानुकूलित यंत्रणा असे सर्वांगिण व सुसज्ज असे हे स्मारक असणार आहे. हे स्मारक वेळेत पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे.
.......................