पुरुषांचा वनवास संपला!
By admin | Published: July 11, 2014 12:20 AM2014-07-11T00:20:52+5:302014-07-11T00:29:52+5:30
सातारा पालिका : पाच वर्षांनंतर मिळाली नगराध्यक्षपदाची संधी!
सातारा : सुमारे पाच वर्षांच्या कालावधीनंतर सचिन सारस यांच्या रूपाने सातारा पालिकेचे नगराध्यक्षपद पुरुष नगरसेवकाकडे आले आहे. गेल्या पाच वर्षांत या पदावर महिलांनी अधिराज्य गाजविले. पुरुषांना या पदावर संधी देण्याच्या उद्देशानेच सारसांची नगराध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यानिमित्ताने पुरुषांचा पाच वर्षांचा वनवास मात्र संपला आहे.
पालिकेचे नगराध्यक्षपद गेल्या पाच वर्षांपासून महिलांसाठी राखीव होते. गेल्या पंचवार्षिकमध्ये अखेरचे अडीच वर्षे इतर मागास प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी हे पद राखीव होते. तर चालू पंचवार्षिकमध्ये पहिले अडीच वर्षे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी हे पद राखीव राहिले. दोन्ही आघाड्यांनी महिलांना या पदावर संधी दिली. महिलांना आरक्षण नसेल तरीही नगराध्यक्षपद मिळून जाते. त्यामुळे पुरुषांना महत्त्वाची पदे कधी मिळणार हाच प्रश्न उपस्थित होतो. राजकारणात काम करणाऱ्या व भविष्यात चांगल्या पदाची इच्छा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुत्सद्देगिरीलाच यामुळे खो बसतो.
यापुढील अडीच वर्षांत अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद राखीव झाले आहे. या पदासाठी हेमा तपासे इच्छुक होत्या. त्यांना पद दिले असते, तर पुरुषांना संधीच मिळणे कठीण होऊन बसले असते. तपासेंनी आटापिटा करून जातपडताळणीचा दाखला मिळविला. मात्र, अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या जागेवरून निवडून आलेल्या सारस यांच्यावर अन्याय झाला असता. या भावनेनेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तपासे यांच्याऐवजी सारस यांना संधी दिली. सारस यांच्या रूपाने पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुरुषांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. (प्रतिनिधी)