अंतर्वस्त्राचा वापरही महत्त्वाचा : मासिक पाळीतील अस्वच्छता ठरतेय ‘काळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:04 PM2020-05-28T17:04:52+5:302020-05-28T17:11:23+5:30
सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आणि या महिलांच्या दिनचर्येत कोणताही बदल न घडू देण्यासाठी समाजाने काम करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. लोकांच्या मनातील गैरसमज काढून पाळीबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही प्रबोधन करणे आवश्यक आहे.
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : मासिक पाळीविषयी समाजात अनेक पातळ्यांवर चुप्पी असल्याने तरुणींसह महिलांमध्ये आवश्यक ज्ञानच पोहोचत नाही. जुन्या अंतर्वस्त्रांचा वापर, निकृष्ट दर्जाचे सॅनिटरी पॅड याबरोबरच योनी मार्गाची नियमित स्वच्छता न राखल्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. याविषयी महिलांशी संवाद साधून मासिक पाळीच्या दिवसांत घ्यावयाच्या काळजी विषयी मनमोकळपणाने संवाद साधणं आवश्यक ठरत आहे.
जगभरात २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसानिमित्त विविध स्तरांवर जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघं जग एकाच ठिकाणावर थांबलं तरीही मासिक पाळी थांबली नाही. त्यामुळे पाळीविषयी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आणि या महिलांच्या दिनचर्येत कोणताही बदल न घडू देण्यासाठी समाजाने काम करण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. लोकांच्या मनातील गैरसमज काढून पाळीबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही प्रबोधन करणे आवश्यक आहे.
दर चार तासांनी
पॅड बदला
बाजारात उपलब्ध असलेले नॅपकीन आणि मॅन्स्ट्रुअल कप अनेकींना परवडत नाहीत. बहुतांश महिला अद्यापही हलक्या दर्जाचे आणि स्वस्तात मिळणारे सॅनिटरी पॅड वापरतात. निकृष्ट दर्जाच्या वस्तूंपासून तयार करण्यात आलेले हे पॅड जास्तवेळ वापरल्याने जंतुसंसर्गाचा धोका वाढवतात. त्यामुळे तर चार तासांनी सॅनिटरी पॅड बदलण्याची सवय लावा.
हे आहेत धोेके
त्वचेचा संसर्ग :
मासिक पाळीत आवश्यक काळजी घेतली नाही तर त्वचेला जखम होणं, खाज सुटणं, जळजळणं हे प्रकार होतात. यामुळे सूज येते, त्वचा लाल होते, काहीदा तर येथे फोड येण्याचे प्रकारही आढळतात.
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन :
मूत्रमार्गातील युरेथ्रामध्ये जंतूचा प्रवेश झाला तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. महिलांमध्ये हा खूप गंभीर आजार मानला जातो, यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते.
वंध्यत्वाचा धोका
मूत्रमार्ग आणि योनी यांची अस्वच्छता असेल तर हानिकारक जंतूंची वेगाने वाढ होते. त्यामुळे जेनिटल ट्रकच्या भागांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. मासिक पाळीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने महिलांमध्ये वंधत्वाचा धोका वाढतो.
अंतर्वस्त्रांना एक्सपायरी डेट असते, हेच अनेकींना माहिती नाही. दर चार महिन्यांनी महिलांनी आपली अंतर्वस्त्र नवीन घेणं आवश्यक आहे. योनीमार्गाची अस्वच्छता किंवा ओलेपणामुळे जंतुसंसर्ग होऊन गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोकाही निर्माण होतो.
- डॉ. स्नेहल पाटील, ब्रेस्ट आॅन्कोसर्जन, सातारा