संतोषचे मानसिक संतुलन ढासळले !
By admin | Published: March 24, 2017 11:34 PM2017-03-24T23:34:54+5:302017-03-24T23:34:54+5:30
वाई हत्याकांड; कोल्हापुरात उपचार सुरू
सातारा : संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणाऱ्या वाई येथील सहा हत्याकांडातील आरोपी संतोष पोळ याचे मानसिक संतुलन ढासळले असून, त्याच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शुक्रवारी सुनावणीदरम्यान पोळ याच्या वकिलांनी न्यायालयात दिली. तर दुसरीकडे सर्व सहाही खून खटले एकत्रच चालविण्यात यावेत, असा अर्ज सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
वाई येथील बहुचर्चित सहा हत्याकांडाची सुनावणी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात होती. यावेळी सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या वतीने दुसऱ्या सरकारी वकिलांनी न्यायालयात विनंती अर्ज सादर केला. सध्या न्यायालयात सहापैकी तीन खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. संतोष पोळने सहाही खून केल्याची माहिती ज्योती मांढरेला दिली होती. त्यामुळे सहाही खून खटले एकत्रित चालविण्यात यावेत, सरकार पक्षाला वारंवार पुरावा सादर करावा लागणार नाही, असे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सुनावणीदरम्यान संतोष पोळला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. पोळचे वकील अॅड. श्रीकांत हुडगीकर यांनी न्यायालयात त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून संतोष पोळचे वजन खूपच कमी झाले आहे. तसेच त्याला अशक्तपणा आला असून, त्याची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे त्याच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या दोन्ही अर्जांचे न्यायालयाने अवलोकन केल्यानंतर सुनावणीची पुढील तारीख दि. १३ एप्रिल नेमण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. (प्रतिनिधी)