कऱ्हाडात विक्रेते फूटपाथवर; प्रवासी रस्त्यावर ! बसस्थानक परिसरातील स्थिती : चायनीज व्यावसायिकांकडून अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:52 PM2018-04-28T23:52:08+5:302018-04-28T23:52:08+5:30
कऱ्हाड : कऱ्हाड शहर हे अतिक्रमणाचं शहर म्हणून सध्या सर्वत्र दिसू लागलं आहे. या शहरात इमारतींपासून ते पादचारी मार्ग, रस्त्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. याचा त्रास हा सर्वांनाच होत आहे. मात्र, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकासमोरील पादचारी मार्गावरचे अतिक्रमण आजतागायत कुणी काढण्याचे धाडस केलेले नाही. उलट पालिकेच्या कृपेने चायनीज विक्रेत फूटपाथवर अन् प्रवासी रस्त्यावर असलेले पाहावयास मिळत आहे.
शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी केली. त्यामुळे शहरातील नागरिक तसेच प्रवाशांकडून रस्त्यावरून चालण्याऐवजी पादचारी मार्गाचा चांगला वापर केला जाऊ लागला. मात्र, आता बांधण्यात आलेल्या या पादचारी मार्गाचा प्रवासी कमी आणि चायनीज विक्रेतेच जास्त फायदा घेत आहे. पालिका अन् पोलीस प्रशासनाच्या नियमांना डावलून या विक्रेत्यांनी बिनधास्तपणे आपला व्यवसाय फूटपाथवर थाटला आहे. यामागे कुणाची ‘मेहरबानी’ तर नाही ना! अशी चर्चा सध्या प्रवाशांतून केली जात आहे.
शहरातील दत्त चौकापासून ते विजय दिवस चौक हा तसा पाहिला तर शंभर मीटरचा अंतर असलेला रस्ता. या रस्त्याकडेला पादचारी मार्गावर प्रवासी कमी अन् विक्रेतेच जास्त असलेले आढळून येतात. सायंकाळची सहाची वेळ झाली की, या ठिकाणी न्युडल्स, चायनीय पदार्थ यांचा घमघमाट सुटतो. उघड्यावर गॅस सिलिंडर ठेवून बिनधास्तपणे हे व्यावसायिक आपले पदार्थ करीत असतात. या ठिकाणी जर गॅस सिलिंडर लिक झाला किंवा अचानक आग लागल्यास मोठी दुर्घटनाही घडण्याची शक्यता आहे.
या विक्रेत्यांना हटविण्यासाठी पालिका तसेच पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी तसेच नागरिकांतून व्यक्त केले जात आहे. फूटपाथवर आदी खाद्यांच्या गाड्या असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांना पादचारी मार्ग असूनही रस्त्यावरून चालावे लागत आहे.
पालिकेकडून कारवाईचा ‘दिखावा’
कºहाड पालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने नुकतीच बसस्थानकासमोर नव्याने सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पादचारी मार्गावर वाहतुकीस अडथळा ठरत असणारे चारचाकी हातगाड्यावर पालिकेने शुक्रवारी कारवाई केली. त्यामध्ये पाच हातगाडे हटविले. मात्र, दुसऱ्या दिवशी पालिकेकडून कारवाईकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. इतर ठिकाणी असणारे हातगाडे जैसे थे असेच उभे राहिले आहेत. त्यामुळे या प्रकारावरून पालिकेकडून मात्र, तात्पुरत्या स्वरुपाचा कारवाईचा दिखावाच केला जात असल्याचे पाहावयास मिळाले.
आतातर रिक्षासुद्धा....
शहरातील बसस्थानकसमोरील असलेल्या फूटपाथवर वडाप व्यावसायिकांकडून रिक्षाही उभ्या केल्या जात असल्याचे प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतात. वर्षभरापूर्वी तर रिक्षांना फूटपाथवर लावण्यासंबंधीचा प्रयोग पोलिसांकडूनच केला गेला होता. मात्र, तो फारसा यशस्वी झाला नाही. आता रस्त्यावर अन् फूटपाथवर अशा दोन्ही ठिकाणी रिक्षा व्यावसायिकांकडून आपली वाहने उभे केली जात आहेत.
चायनीज स्टॉल जैसे थे
शुक्रवारी दोन तास अतिक्रमण हटावची पालिकेने कारवाई केली. बसस्थानकाबाहेर मुख्य रस्त्यांवर मात्र, मोठ्या प्रमाणात चायनीज स्टॉल व गाडे उभे करण्यात आले होते. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने नक्की अतिक्रमण हटावची कारवाई करून नेमके काय साध्य केले? अशी चर्चा नागरिकांतून केली जात होती.
सायंकाळनंतर मद्यपींच्या
प्रमाणात वाढ
बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात चायनीज व्यावसायिकांच्या गाड्यांचे प्रमाण असल्याने त्या ठिकाणी मांसाहार करण्यासाठी काही मद्यपीही येत असतात. रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी मद्यपानही मोठ्या प्रमाणात केले जात असल्याची चर्चा इतर व्यावसायिकांतून केली जातेय.