आठवडा बाजार नसल्याने व्यापारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:15 PM2020-10-12T14:15:31+5:302020-10-12T14:18:04+5:30
coronavirus, market, sataranews कोरोना महामारीमुळे प्रत्येक व्यवसायाची कोंडी झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनासह व्यापाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. खटाव-माण तालुक्यातील आठवडे बाजारांना बंदी असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून त्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असून त्यांनी रस्त्याकडेलाच विक्री सुरू केली आहे.
वडूज : कोरोना महामारीमुळे प्रत्येक व्यवसायाची कोंडी झाली असून यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनासह व्यापाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. खटाव-माण तालुक्यातील आठवडे बाजारांना बंदी असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातून त्यांची जगण्यासाठी धडपड सुरू असून त्यांनी रस्त्याकडेलाच विक्री सुरू केली आहे.
शहरातील तसेच तालुक्यातील मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांचे जीवनमान आठवडे बाजारांवर अवलंबून आहे. प्रपंचाचा रहाटगाडा व उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या मालावरच भले मोठे संकट कोसळले आहे. यामध्ये प्रामुख्याने छोटी मिठाई दुकाने, कापड व्यावसायिक, कपबशी, खेळणी, चप्पल, चटणी मसाला, चुरमुरे-फुटाणे तसेच फळ विक्रेत्यांची आठवडा बाजार नसल्यामुळे उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत करावी लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मंडईकडे फिरकेनासे झाले आहेत. तर तालुक्यातील वडूज, पुसेगाव, पुसेसावळी, मायणी, खटाव, औंध, कातरखटाव, कलेढोण, चितळी व चौकीचा आंबा मुख्य शहरांचे आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील ग्राहकांचीही मोठी कुचंबना होत आहे.
यामुळे ग्राहकांबरोबरीने मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी आठवडा बाजार करणारे मध्यमवर्गीय व्यापारी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. प्रचंड दडपणाखाली आहेत. व्यवसायातील अस्थिरतेमुळे ताणतणावाखाली असलेले हे व्यापारी दिशाहीन झालेले दिसून येत आहेत.
प्रशासनाने या मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांसाठी आठवडे बाजाराची नियमावली तयार करून त्यांच्या कुटूंबाची हेळसांड थांबवावी. त्यांच्यावर असणारे कर्जाचे हप्ते थकीत आहे. सध्या रडतखडत सुरू असलेला प्रपंच याची शासनाने गंभीर दखल घेत आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.