Wedding ceremony : साखरेच्या रुखवताचा विवाह सोहळ्यात गोडवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:15 PM2021-12-29T17:15:40+5:302021-12-29T17:16:09+5:30
विवाह सोहळ्यात अशा रुखवताला मानाचे स्थान असते ; परंतु काळ बदलला तसा रुखवतही बदलत गेला. वधू-वराच्या आवडी-निवडीप्रमाणे रुखवत देण्याची परंपरा सुरू झाली.
सचिन काकडे
सातारा : विविध साहित्याचा कल्पकतेने वापर करून बनविलेल्या वस्तू म्हणजे रुखवत. विवाह सोहळ्यात अशा रुखवताला मानाचे स्थान असते ; परंतु काळ बदलला तसा रुखवतही बदलत गेला. वधू-वराच्या आवडी-निवडीप्रमाणे रुखवत देण्याची परंपरा सुरू झाली.
याही पलीकडे जाऊन आता साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी रुखवतातील वस्तूंना चक्क साखरेचा साज चढवलाय. केवळ साखरेपासून तयार केलेला हा अनोखा रुखवत विवाह सोहळ्याची गोडी देखील वाढवू लागला आहे.
असा तयार झाला रुखवत
-साखर, साखरेचा पाक अन् खाऊच्या रंगांचा अत्यंत कल्पकतेने वापर करून हा रुखवत तयार करण्यात आला आहे.
-या वस्तू बनविण्यासाठी जवळपास ६ किलो साखरेची गरज भासते. बऱ्याचदा रेडिमेड अथवा घरात बनविलेला फराळ रुखवत म्हणून वधूसोबत पाठविला जातो.
-हा फराळ काही दिवस टिकतो. मात्र, साखरेचे तसे नाही. साखरेचा स्वयंपाकघरात पुन्हा वापरही करता येऊ शकतो, असे व्यापारी सांगतात.
रुखवतातील पदार्थ
या रुखवतात साखरेपासून बनविलेला हळदी-कुंकवाचा करंडा, कलश, फराळाचे ताट, करंजी, लाडू, मोदक, बर्फी, महादेवाची पिंड, तांब्या भांडे, तुुळशी वृंदावन, आईस्क्रीम, जेवणाचे ताट अशा वस्तूंचा समावेश आहे.
लग्नसराईत रुखवताची संकल्पना दिवसेंदिवस बदलू लागली आहे. आता विविध प्रकारच्या वस्तूंबरोबरच साखरेच्या रुखवतालाही मागणी वाढली आहे. साखर पुन्हा उपयोगात येणारा पदार्थ आहे. त्यामुळे असा रुखवत लग्न सोहळ्याची शोभाच नव्हे तर, गोडवाही वाढवत आहे. - योगेश मोदी, व्यावसायिक, सातारा