मायणीत गटाराच्या अर्धवट कामामुळे व्यापारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:09+5:302021-02-26T04:53:09+5:30
मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून, अनेक ठिकाणी ...
मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून, अनेक ठिकाणी गटारांचे काम अर्धवट ठेवले आहे. संबंधित ठेकेदाराकडे याविषयी विचारणा केल्यानंतर त्याच्याकडून चालढकल व उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे येथील व्यापारी त्रस्त झाले असून, अर्धवट असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील मुख्य चांदणी चौक परिसर व मराठी शाळा बसस्थानक, चावडी चौक, नवी पेठ भागातून मल्हारपेठ - पंढरपूर हा राज्य मार्ग जातो. या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. अनेक ठिकाणी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेली बांधकामे स्थानिक रहिवाशांनी काढली. ज्या ठिकाणचे अडथळे निघत नाहीत वा अशी बांधकामे काढली जात नाहीत, अशा ठिकाणचे काम अर्धवट सोडून तर काही ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने काम पूर्ण करून ठेकेदार हात झटकत आहे.
येथील चांदणी चौक परिसरातील एका बाजूचे गटाराचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे गटाराचे काम कित्येक दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्याठिकाणी गटाराचे बांधकाम करण्यासाठी खड्डे काढले आहेत. या खड्ड्यांशेजारी असलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
काहींनी दुकाने उघडली तर दुकानात ग्राहकांना येण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नाही. रोजच्या येण्या-जाण्याच्या त्रासामुळे काही व्यापारी त्रस्त झाले आहेत.
याठिकाणी संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी पुरेसे लक्ष देत नसल्याने कामाच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून याबाबतची माहिती घ्यावी लागत आहे. त्यामुळे हे कर्मचारी पूर्ण माहिती नसल्याने उडवाउडवीची किंवा चालढकल करणारी उत्तरे व्यापाऱ्यांना व स्थानिक ग्रामस्थांना देत आहेत. त्यामुळे या कामाच्या हलगर्जीपणाची चौकशी व्हावी, अशी मागणी व्यापारी व स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
चौकट
अनेक दिवसांपासून हे काम अर्धवट असल्याने दुकानात येणाऱ्या ग्राहकांना अडचणीचे होत आहे. वारंवार माहिती घेऊनही माहिती मिळत नाही.
- सुदाम ठोंबरे, व्यावसायिक, मायणी
चौकट -
मायणी मुख्य बाजारपेठेतून व चांदणी चौक भागातून जाणाऱ्या सुमारे दोन किलोमीटर मार्गाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. अजून किती दिवस हे काम चालणार, हे सांगणे अवघड आहे. मात्र, या कामामुळे व्यापारी, रहिवासी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
२५ मायणी रोड
मायणी येथील चांदणी चौक परिसरात अनेक दिवसांपासून गटारांचे बांधकाम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. (छाया : संदीप कुंभार)