पारा २६ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:34+5:302021-06-11T04:26:34+5:30

सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून, ...

Mercury at 26 degrees | पारा २६ अंशांवर

पारा २६ अंशांवर

Next

सातारा : जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून, थंडीची तीव्रता वाढली आहे. रात्री व पहाटेच्या वेळी सर्वत्र थंडी पडत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. गुरुवारी हवामान विभागाने साताऱ्याचे कमाल तापमान २६.८ तर किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे.

पथदिवे बंद

सातारा : पावसामुळे शहरातील केसरकर पेठ व माची पेठ व डोंगर भागातील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशांना रात्री ये-जा करताना अनेक अडचणी येत आहेत. शाहू नगरकडे जाण्यासाठी चारभिंतीजवळील पर्यायी रस्त्याचा उपयोग केला जातो. येथील पथदिवे सातत्याने बंद पडत असल्याने वाहनधारकांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे पालिकेने नादुरुस्त पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

औषध फवारणी

सातारा : डेंग्यू, मलेरिया तसेच साथरोगांच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी जंतूनाशक औषधांची फवारणी केली जात असून, नाले व ओढे स्वच्छतेचे कामही हाती घेण्यात आले आहे. शहरातील माची पेठ, केसरकर पेठ, मल्हार पेठ या भागात बुधवारी दिवसभर जंतूनाशक औषध फवारणीचे काम सुरू होते.

कांद्याचे दर उतरले

सातारा : साताऱ्यातील मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढली असून, दर उतरल्याने याचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत कांद्याची विक्री प्रतिकिलो ३५ ते ४० रुपये दराने केली जात होती. हा कांदा आता २५ रुपयांवर आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत नव्या कांद्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे दरही उतरू लागले आहेत. तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर दरात घसरण झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कारवाईला ‘ब्रेक’

सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाईची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापारणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तरीही नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

पाचवड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते आनेवाडी टोल नाका या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरचा अभाव जाणवत आहे. महामार्ग प्राधिकरणने धोकादायक ठिकाणी तातडीने रिफ्लेक्टर लावावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

रस्त्याची दुरवस्था

सातारा : सातारा पालिकेच्यावतीने शहरात भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. संचारबंदीमुळे हे काम सध्या धिम्या गतीने होत आहे. व्यंकटपुरा पेठ, मंगळवार पेठ, यादोगोपाळ पेठ या भागात या योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. परंतु, ठिकठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने याचा नागरिकांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला तरी दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ न झाल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कसरत थांबली

सातारा : जुना मोटर स्टॅँड ते बुधवार नाका या मार्गाच्या डांबरीकरणााचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यामुळे सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या मार्गावरून वाहन चालवणे जिकरीचे बनले होते. पालिकेने डांबरीकरणाचे काम मार्गी लावल्याने वाहतूक सुकर झाली आहे.

Web Title: Mercury at 26 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.