जिल्हा काकडला; सातारा १२, महाबळेश्वर ११.८ अंशांवर; ग्रामीण भाग गारठला; शेतीच्या कामांवर परिणाम
By नितीन काळेल | Published: November 28, 2024 12:02 AM2024-11-28T00:02:42+5:302024-11-28T00:03:43+5:30
जिल्ह्यात नोव्हेेंबर महिन्याच्या प्रारंभी थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला किमान तापमान २० अंशादरम्यान होते...
सातारा : जिल्ह्याचा पारा आणखी घसरला असून, बुधवारी सातारा शहरात १२, तर महाबळेश्वरला ११.८ अंशाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. ग्रामीण भाग गारठला असल्याने शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात नोव्हेेंबर महिन्याच्या प्रारंभी थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला किमान तापमान २० अंशादरम्यान होते. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत होती. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता होती. पण, मागील १० दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार येत चालला आहे. सहा दिवसांपासून जिल्ह्याचा पारा कायम १५ अंशाच्या खालीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागतोय. यामुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे.
सातारा शहरात मंगळवारी १२.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. पण, एकाच दिवसात पारा जवळपास एक अंशाने घसरला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास शहराचे किमान तापमान १२ अंश नोंद झाले. यामुळे सकाळच्या सुमारास थंडीची लाट जाणवली. तसेच शीतलहरही असल्याने नागरिकांना हुडहुडी भरून येत होती. परिणामी सकाळी फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. महाबळेश्वरचा पारा घसरला आहे. यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाल्याचे जाणवते. सायंकाळी थंडीच्या वेळी पर्यटकांची संख्या तुरळक प्रमाणात दिसून येत आहे.
जिल्ह्याचा पारा घसरल्याने ग्रामीण भागातही थंडीची लाट आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरीवर्ग दुपारच्या सुमारास शेतीची कामे उरकत आहे. तसेच शहरातील बाजारपेठेतही सायंकाळच्या सुमारास गर्दी जाणवत नाही. थंडीची तीव्रता पाहता आणखी काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. १८ नोव्हेंबर १६.८, १९ नोव्हेंबर १४.७, २० नोव्हेंबर १४.५, २१ नोव्हेंबर १३.६, २२ नोव्हेंबर १३.७,
२३ नोव्हेंबर १४.२, २४ नोव्हेंबर १४.५, २५ नोव्हेंबर १३.८, २६ नोव्हेंबर १२.९ आणि २७ नोव्हेंबर १२.
महाबळेश्वरला आठवड्यापासून १२ ते १३ अंशादरम्यान पारा -
महाबळेश्वर शहरात मागील आठवड्यापासून १२ ते १३ अंशादरम्यान किमान तापमान आहे. त्यामुळे महाबळेश्वरची थंडी कायम असल्याचे दिसून येत आहे. महाबळेश्वरला मंगळवारी किमान तापमान १२.६ अंश होते, तर बुधवारी घसरून ११.८ अंशावर आले.