सातारा तापला! वर्षात प्रथमच पारा ३८ अंशांजवळ; बाजारपेठेत तुरळक वर्दळ
By नितीन काळेल | Published: April 4, 2023 06:45 PM2023-04-04T18:45:16+5:302023-04-04T18:45:50+5:30
सातारा शहराचा पारा वाढत असून मंगळवारी ३७.५ अंशांची नोंद झाली.
सातारा: सातारा शहराचा पारा वाढत असून मंगळवारी ३७.५ अंशांची नोंद झाली. त्यामुळे शहराचे या वर्षातील आतापर्यंतचे हे उच्चांकी तापमान ठरले. तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या सुमारास साताऱ्यातील बाजारपेठेत तुरळक वर्दळ जाणवली तसेच प्रमुख रस्त्यावरील वाहतूकही मंदावली होती. सातारा शहरात दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत थंडी जाणवते; पण, यावर्षी कडाक्याची थंडी अनुभवयास मिळालीच नाही. त्यातच फेब्रुवारीच्या मध्यावरच थंडी संपली होती. त्यानंतर पारा वाढत गेला.
२१ आणि २३ फेब्रुवारीला सातारा शहराचे कमाल तापमान ३६.३ अंश नोंद झाले होते. हे २०२३ या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. त्यावेळीही दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी तापमान घसरले. मार्च महिन्याच्या मध्यावर तर अवकाळी पाऊस झाला. परिणामी शहराचा पारा २९ अंशांपर्यंत खाली आला होता. यामुळे सातारकरांची काही दिवस ऊन आणि उकाड्यापासून सुटका झाली. पण, गेल्या तीन दिवसांपासून पारा वाढू लागला आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत नसली तरी दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हामुळे रस्त्यावरुन चालणेही धोकादायक बनले आहे. मंगळवारी तर सातारा शहराचा पारा ३७.५ अंश नोंद झाला. उन्हाची तीव्रता असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावर तसेच बाजारपेठेत तुरळकच लोक दिसत होते. तसेच वाहतुकीवरही परिणाम झालेला. नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवरही कुठेही गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे सातारकरांना एप्रिलच्या सुरुवातीपासूनच कडक उन्हाशी सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सोमवारच्या तुलनेत सातारा शहराचा पारा दीड अंशाने वाढला आहे. यामुळे उन्हाच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात उन्हामुळे शेतकरी आणि मजूर हैराण झाले आहेत.
सातारा शहरातील कमाल तापमान...
दि. २५ मार्च ३४.०७, २६ मार्च ३५.०२, २७ मार्च ३५.०७, २८ मार्च ३५.०८, २९ मार्च ३५.०८, ३० मार्च ३४.०५, ३१ मार्च ३४.०७, दि. १ एप्रिल ३४.०७, २ एप्रिल ३४.०८, ३ एप्रिल ३५.०७, दि. ४ एप्रिल ३७.०५.
महाबळेश्वरचा पारा वाढला
थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा २९ अंशांच्या दरम्यान सतत होता. मात्र, मंगळवारी कमाल तापमान ३१.०१ नोंद झाले. यामुळे महाबळेश्वरही तापू लागले आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात महाबळेश्वरचा पारा ३२ अंशापर्यंत पोहोचला होता.