पारा वाढला पण; हुडहुडी जाता जाईना..१२ अंशावर तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:22 PM2020-12-24T18:22:15+5:302020-12-24T18:24:42+5:30
Winter Session Maharashtra Satara- सातारा जिल्ह्यातील किमान तापमान वाढू लागले असून साताऱ्यात १२.०५ अंशाची नोंद झाली. पण, अजूनही हवेत गारठा व थंडगार वाऱ्याची लहर असल्याने जिल्हावासीयांची हुडहुडी जाता जाईना अशी स्थिती आहे.
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान वाढू लागले असून साताऱ्यात १२.०५ अंशाची नोंद झाली. पण, अजूनही हवेत गारठा व थंडगार वाऱ्याची लहर असल्याने जिल्हावासीयांची हुडहुडी जाता जाईना अशी स्थिती आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडी सुरू आहे. मात्र, या थंडीत सतत चढ-उतार सुरू आहे. कधी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली येत आहे. तर काहीवेळा ढगाळ वातावरणामुळे तापमान २० अंशांवरही जात आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार आला. त्यामुळे जिल्ह्यातील थंडीत मोठी वाढ झाली. तीन दिवसांपूर्वी तर साताऱ्यातील पारा ९ अंशावर आला होता. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले होते.
जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण. या ठिकाणीही या वर्षातील नीच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी झाली. ११.०३ अंश तापमान नोंदले गेले. सध्या साताऱ्यासह महाबळेश्वरच्या किमान तापमानात वाढ होत चालली आहे. साताऱ्यात बुधवारी १०.०१ तर गुरुवारी १२.०५ अंश तापमानाची नोंद झाली. मात्र, हवेत गारठा कायम आहे. त्यातच थंड वाऱ्याची झुळूक येत असल्याने रात्रीपासून सकाळपर्यंत हुडहुडी भरून राहत आहे.