पारा खालावला; जिल्हा गारठला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:20 PM2018-12-30T22:20:33+5:302018-12-30T22:20:39+5:30
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, गेल्या दोन दिवसांपासून तर किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले ...
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, गेल्या दोन दिवसांपासून तर किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले आहे. तर सततच्या गारठ्यामुळे थंडीने मुक्काम केल्याची भावना लोकांची झाली आहे. दरम्यान, या थंडीमुळे शहराच्या ठिकाणच्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.
गेल्यावर्षीपेक्षा यंदा थंडीला लवकर सुरुवात झाली. दिवाळीच्या सणापासून थंडीला प्रारंभ झाला होता. त्यानंतर हळूहळू थंडीत वाढ होऊन १५ नोव्हेंबरच्या सुमारास यावर्षी प्रथमच किमान तापमान १३.४ अंशापर्यंत खाली आले होते. तर दि. १ डिसेंबरला किमान तापमान १२.३ अंशावर होते तर त्यानंतर ५ ते ९ डिसेंबरपर्यंत किमान तापमान अचानक वाढले. यामुळे थंडी गायब झाली होती. ८ आणि ९ डिसेंबरला तर १६.९ अंश तापमान नोंदले होते. मात्र, १० डिसेंबरला एका दिवसात दीड अंशाने तापमान कमी झाले तर ११ डिसेंबरला एकदम ६ अंशाने तापमान कमी होऊन ९.५ अंश नोंदले गेले. यामुळे एकदमच थंडीची लाट निर्माण झाली.
आता तर यावर्षींचे आतापर्यंतचे सर्वात कमी म्हणजे ९ अंशापर्यंत किमान तापमान खाली आहे. यामुळे हुडहुडी भरून येत आहे. शनिवारी तर किमान तापमान ९.१ अंशावर होते. तर रविवारी ९.४ होते. पण, सतत तापमान १० अंशाच्या आसपास राहिल्याने गारठा वाढला आहे. यामुळे शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. शेतकरी दुपारच्या वेळी शेतातील कामे करतात. तसेच मोठ्या शहरातील बाजारपेठेवर याचा परिणाम दिसत आहे. रात्री आठनंतर बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून येत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. ऊबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.