कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:39 AM2021-07-27T04:39:49+5:302021-07-27T04:39:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असताना आता ऑनलाईन ठकसेन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. ...

The message of a low percentage of debt came | कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असताना आता ऑनलाईन ठकसेन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कमी टक्क्यांत कर्ज देतो, असे मेसेज पाठवून अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगणे अन् बॅँक खाते रिकामे करणे असे प्रकार सध्या वाढले आहेत. त्यामुळे अशा फसव्या मेसेजला बळी न पडण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

ऑनलाईन ठकसेनांकडून नामांकित कंपनी, वित्तीय संस्था, बँकाच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवले जात आहे. कमी टक्क्यांत व कोणत्याही कागदपत्रांविना कर्ज मिळेल, असा मेसेज व लिंक मोबाईलवर पाठवली जात आहे. ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असलेले अनेक नागरिक अशा फसव्या मेसेजेसना बळी पडत आहेत. दरम्यान, कोणतीही खातरजमा न करता असे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांचे बॅँक खाते क्षणात रिकामे केले जात आहे. सध्या ग्रामीण भागात असे प्रकार वाढले असून, फसव्या मेसेजला बळी पडू नये, कोणतेही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू नये, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

(चौकट)

अ‍ॅप डाऊनलोड करताच बॅँक खाते साफ

१. अनेक नाागरिक फसव्या मेसेजला बळी पडून मोबाईलवर आलेल्या लिंकद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करून घेत आहेत. एकदा का अ‍ॅप डाऊनलोड झाले की काही व्यक्ती स्वत:ची माहिती त्या अ‍ॅपमध्ये नोंदवतात.

२. यानंतर ऑनलाईन ठकसेन मोबाईलमधील डाटा क्लोनिंगद्वारे शेअर करून बँक खाते रिकामे करून घेत आहेत.

३. खात्यातून रक्कम कमी झाल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापासून सजग राहणे गरजेचे आहे.

(चौकट)

या अमिषांपासून सावधान

- कोणतीही वस्तू तारण न ठेवता अथवा कोणत्याही कागदपत्रांशिवाय कर्ज मिळेल, असा मेसेज करून लिंक आली तर ती उघडू नये.

- कमी टक्के व्याजदरात कर्ज देण्याचा मेसेजही अनेकांना येत आहे. याची सर्वप्रथम खातरजमा करावी.

- केवळ बॅँकेचे पासबुक, आधारकार्ड व पॅनकार्डद्वारे कर्ज मिळेल, असे आमिषही ठकसेनांकडून दाखवले जात आहे.

(चौकट)

यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकता !

१. साताऱ्यातील एका शिक्षकाला एटीएम कार्ड पासवर्डची मुदत संपल्याचा फोन आला. बॅँकेतून बोलत असल्याचे सांगितल्याने शिक्षकाने संबंधितावर विश्वास ठेवला आणि सांगितलेल्या सूचनांचे पालन केले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बॅँक खात्यातून साडेचार लाख रुपये गायब झाले अन् शिक्षकाला आपली चूक लक्षात आली.

२. शहरातील एका महिलेला लॉटरी लागल्याचा निनावी फोन आला होता. ही रक्कम जमा करण्यासाठी तुमचे बॅँक डिटेल्स, पॅनकार्ड व एटीएमवरील चार अंकी क्रमांक सांगा, असे तिला सांगण्यात आले. महिलेनेदेखील आनंदाच्या भरात सर्व माहिती दिली आणि काही वेळात तिच्या खात्यातून तब्बल ५२ हजार रुपये गायब झाले.

(चौकट)

ही घ्या काळजी...

१. बॅँकांकडून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे फसवे मेसेज पाठवले जात नाहीत. त्यामुळे असे मेसेज आल्यास तातडीने बॅँकेशी संपर्क साधावा.

२. कोणत्याही लिंकद्वारे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू नका. फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच तातडीने पोलिसांना याची माहिती द्या.

३. बॅँक, एटीएम, पॅनकार्ड यासह इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.

(कोट)

नागरिकांनी कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये. कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करू नये. कर्ज देण्याबाबत काही मेसेज आले तर सर्वप्रथम खातरजमा करावी. कोणालाही आपली वैयक्तिक माहिती व बॅँक डिटेल्स देऊ नका. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.

- अजय जाधव, सायबर तज्ज्ञ

Web Title: The message of a low percentage of debt came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.