सातारा जिल्ह्यात भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप
By admin | Published: September 16, 2016 10:57 PM2016-09-16T22:57:57+5:302016-09-16T23:44:58+5:30
अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्ये : कायदा-सुव्यवस्था चोख राखत उत्सव शांततेत पार
सातारा : सातारा शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी पारंपरिक उत्साहात बाप्पांना निरोप देण्यात आला. पारंपरिक वाद्यांचा ठेका अन् शांततेच्या वातावरणात या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत उत्साहात पार पडल्या.
सातारा शहरातील मिरवणुकीचा प्रारंभ पालिकेच्या गणपतीची आरती करून करण्यात आला. त्यानंतर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
आबालवृद्धांची मिरवणुकीला हजेरी हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सकाळपासून मंडळांनी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ केला. सायंकाळी पाचनंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मुख्य चौकांमध्ये मिरवणूक पाहायला गर्दी केली.
पारंपरिक खेळांबरोबरच, शिवरायांचा पोवाडा, लाठी-काठी, पथनाट्य आदींचे आयोजन मंडळांनी केले होते. हे खेळ पाहण्यासाठी सातारकरांनी चांगलीच गर्दी केली होती.
राधिका रस्त्यावरील कृत्रिम तलाव परिसर कार्यकर्त्यांच्या जयघोषांनी दुमदुमून निघाला. रात्री उशिरापर्यंत आपल्या लाडक्या बाप्पाला लवकर येण्याची आर्जव करून तरुण भक्तांनी बाप्पांचा निरोप घेतला. (प्रतिनिधी)
डॉल्बीमुक्त बरोबरच गुलालमुक्त मिरवणूक!
खंडाळा : खंडाळ्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गुलालमुक्त व डॉल्बीमुक्त गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली. खंडाळा शहरातील गणेश विसर्जन उत्साहात झाले. महिलांही यात सहभागी झाल्या होत्या. पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बीमुक्त आणि गुलालविरहित मिरवणूक उत्साहात पार पडल्या.