बाल वारकऱ्यांनी दिला वृक्ष संगोपनाचा संदेश
By admin | Published: June 30, 2017 01:09 PM2017-06-30T13:09:11+5:302017-06-30T13:09:11+5:30
सोनगाव येथे वृक्षारोपण उत्साहात : कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून उपक्रम
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. ३0 : ढोल-ताशे, टाळ-मृदंग आणि हरि नामाच्या गजराने सोनगाव भक्ती रसात न्हाऊन तर निघालेच पण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या बाल वारकऱ्यांनी गावातून दिंडी काढून वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन, संगोपन करा, असा सामाजिक संदेश देवून जनजागृती केली.
निमित्त होते कर्तव्य सोशल ग्रुपच्या वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन उपक्रमाचे. या उपक्रमांतर्गत सोनगाव, ता. सातारा येथे रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० झाडे लावण्यात आली. यावेळी कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. वृक्षारोपणानंतर प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली. प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव त्या झाडाच्या बुंध्याला पाटीद्वारे लावण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही झाडे लावून देऊ, तुम्ही संगोपन करा, असा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोनगाव येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जेसीबीच्या साह्याने खड्डे काढून देण्यात आले. यानंतर पर्यावरणपूरक रोपही मोफत देण्यात आले. या रोपांची लागवड वेदांतिकाराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालचमूंच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली. या दिंडीत वारकऱ्यांचा वेष परिधान करुन, हाती दिंड्या पताका घेवून असंख्य बाल वारकरी सहभागी झाले होते. या दिंडीत वेदांतिकाराजेही सहभागी झाल्या होत्या. ही दिंडी वृक्षारोपणस्थळी आल्यानंतर वेदांतिकाराजे भोसले यांनी निसर्ग रक्षण, पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपनाचे महत्व पटवून दिले.
जागतिक तापमान वाढ, पर्जन्यमानात घट, गारपीट, अतिवृष्टी, भीषण दुष्काळ आदी गंभीर संकटे निसगार्चा समतोल बिघडल्यानेच ओढावत आहेत. निसगार्चे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केवळ वृक्षारोपण करुण चालणार नाही तर, वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संवर्धन, संगोपन करणे आवश्यक आहे, असे सांगून लावलेल्या झाडांचे संगोपन करा, असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले.
यावेळी स्कूलचे मुख्याध्यापक एन. बी. भांबुरे, पी. जे. सोनावणे, व्ही. एस. ढवळे, के. एन. देशमुख, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला रसाळ, सुजाता क्षिरसागर, जयमाला चव्हाण, वृषाली खांडेकर, मारुती पाटील यांच्यासह विश्वास नावडकर, शशिकांत जाधव, रघुनाथ जाधव, धोंडिराम जाधव, रघुनाथ कदम, संतोष राऊत, रमेश पवार, ग्रामसेवक डोंगरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनव उपक्रमात सहभागाचे आवाहन...
निसर्ग रक्षणासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने आम्ही झाडे लावून देणार, तुम्ही संगोपणाची जबाबदारी पार पाडा, या अनोखा उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे. ज्यांना रोपे पाहिजेत त्यांना मोफत रोपे देऊन ग्रुपतर्फेच वृक्षारोपणही करुन दिले जात आहे. या अभिनव उपक्रमात सहभागी होवून निसर्ग रक्षणाची सामाजिक जबाबदारी पार पाडावी. वृक्षारोपणानंतर जे लोक झाडांची काळजी घेतील. संगोपण करुन वृक्षवाढीसाठी सकारात्मक प्रयत्न करतील अशा लोकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी केले आहे.