दलदलीच्या विळख्यात म्हाडा कॉलनी
By admin | Published: February 27, 2015 09:17 PM2015-02-27T21:17:13+5:302015-02-27T23:25:11+5:30
सहा महिन्यांपासून गटारे तुंबली : उपाययोजनेची नागरिकांची मागणी
सातारा : देशात ‘स्वाइन फ्लू’सारख्या रोगाने तोंडवर काढले आहे. यासाठी शासनामार्फत स्वच्छतेचे संदेश देण्यात येत आहे. यासाठी पालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी अंग झटकून कामला लागले आहेत. परंतु साताऱ्यातील सदर बझार येथील म्हाडा कॉलनी मागील सहा महिन्यांपासून दलदलीत सापडली असून देखील ही बाब पालिकेच्या निदर्शनात आलेली नाही.
सदर बझार येथून महामार्गाकडे जाणाऱ्या या मार्गावरच एकीकडे म्हाडा कॉलनी, लक्ष्मी टेकडी वसाहत वसली आहे. जवळपास सदर बझार येथील अनेक वस्त्यांचे या ठिकाणी सांडपाणी सोडण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांतून अधिक काळ येथील गटारे तुंबली आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून संपूर्ण परिसरात दलदलीत झाली आहे.
मुळातच या ठिकाणी डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे या सांडपाण्यात डबकीत बसून रोगराई पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. याविषयी वारंवार पालिका नगरसेवक व स्वच्छता विभागाला कळवून देखील दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे भविष्यात येथे रोगराई पसरण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. म्हाडा कॉलनीच्या पूर्व भागात वस्ती वाढली असून, याच मार्गाचा वापर येथील नागरिकांना करावा लागत आहे. तर सदर बझार येथील नागरिकांनाही महामार्गावर जाण्यासाठी हा मार्ग वापरावा लागत आहे. येथून जाताना डबक्यातून जावे लागत आहे. येथे डास, माश्या, आळ्या डबक्यात दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात रोगराईत वाढ झाली आहे.
म्हाडा कॉलनी, लक्ष्मी टेकडी वसाहत व येथील जवळपास २०० ते ३०० कुटुंबीयांना या दलदलीचा त्रास सहन करावा लागत आहे. या दलदलीमुळे रोगराई पसरण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील चिमुकले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी म्हणून यावर लवकरच पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
पालिकेचे दुर्लक्ष
दरम्यान, सदर बझार येथील पूर्वेकडील भागात नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी पालिका दुर्लक्ष करत आहे. येथील पुढील भाग हा खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो, त्यामुळे येथील स्वच्छता होत नाही, असा काही नागरिक आरोप करीत आहे.