म्हसवडमध्ये दारूबंदी !
By admin | Published: June 21, 2017 12:39 AM2017-06-21T00:39:18+5:302017-06-21T00:39:18+5:30
पालिका सभेत ठराव : निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : म्हसवड नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने मंगळवारी (दि. २०) झालेल्या विशेष सभेत नगरपरिषद हद्दीतील दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अशा प्रकारचा निर्णय घेणारी म्हसवड राज्यातील पहिलीच नगरपालिका ठरली आहे.
म्हसवड पालिकेची सभा नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पालिका सभागृहात पार पडली. या सभेत सात विषय ठेवण्यात आले होते. यापैकी पालिका हद्दीतील दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्याच्या ठरावावर सत्ताधारी व विरोधकांनी मते मांडली व हा विषय सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.
सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखालील म्हसवड नगरपालिकेत सत्तांतर होऊन सत्ता परिवर्तन पॅनेलच्या ताब्यात आली. नुकतीच शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष तुषार विरकर व सत्ताधारी नगरसेवकांची बैठक घेऊन शहरात दारूबंदी व अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी पालिकेने ठराव करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी झालेल्या विशेष सभेत हा महत्त्वपूर्ण विषय मांडण्यात आला. या विषयाला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी एकमुखी पाठिंबा देत टाळ्या वाजवून स्वागत केले. हा निर्णय घेताना विशेषत: महिला नगरसेवकांनी आग्रही भूमिका घेतल्याचे सभागृहात दिसून आले.
सभागृहापुढे सात विषय मांडण्यात आले होते. यापैकी पाच विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले, तर दोन विषय पुढील सभेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिक्षण सभापती शहाजी लोखंडे, नियोजन सभापती गणेश रसाळ, विरोधी गटनेते अखिल काझी, डॉ. वसंत मासाळ, विकास गोंजारी, हिंदमालादेवी राजेमाने, सविता म्हेत्रे, सविता माने, कलाबाई पुकळे, गटनेते धनाजी माने, दीपक विरकर, केशव कारंडे, संग्राम शेटे, तेजस्विनी सोनवणे, शोभा लोखंडे, मनीषा विरकर, रणजित येवगे उपस्थित होते.
----
शेखर गोरे यांनी पालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा संकल्प बैठकीत व्यक्त केला होता. तो निर्णय मंगळवारी सभागृहासमोर ठेवण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाला सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी पाठिंबा देऊन बाटली हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
- तुषार विरकर, नगराध्यक्ष