म्हसवडला कोरोना बाधितांची संख्या कमी तर मृत्यूदर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:13 PM2020-10-01T20:13:36+5:302020-10-01T20:15:32+5:30
number of corona cases, death rate increased, news in satara म्हसवड व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असल्याने म्हसवडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
म्हसवड : म्हसवड व परिसरात गेल्या तीन-चार दिवसांत कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असल्याने म्हसवडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र मृत्यूचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच दिवसांत तब्बल आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
म्हसवड शहरात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत कोरोनाने अक्षरश: हाहाकार उडवून दिला होता. शहरात दररोज २५ ते ३० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी ती वाढत गेल्याने आरोग्य विभागाबरोबर प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली होती.
कोरोनाला रोखण्याठी म्हसवड ग्रामस्थ, नगरसेवक व प्रशासनाने शहरात १४ दिवसांचा लॉकडाऊन पाळला. या कालावधीतही काही व्यापाऱ्यांने सर्वच नियमांना फाटा देत ह्यमी किती हुशार आहे. माझे दुकान उघडल्याशिवाय माझे कुटुंब चालत नाहीह्ण या अविर्भावात दुकाने उघडी ठेवून कोरोनाचा संसर्ग वाढवण्याचे काम केले.
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. या प्रयत्नांना यशही येत आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांत म्हसवडमधील बाधितांची संख्या कमी झाली आहे. मात्र, आठ जणांचा मृत्यू झाल्याने चिंतेच वाढ झाली आहे. बाधितांबरोबरच मृत्यूदर रोखण्याचे मोठे आव्हान आता आरोग्य यंत्रणेपुढे आहे.
प्रभावी उपायोजनांची गरज
बंद काळात दुकाने उघडी ठेवल्याने बाधितांची संख्या वाढती गेली. या दुकानदारांवर व व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास म्हसवड पोेलीस व प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. बसस्थानक चौकात आठ ते दहा पोलीस कर्मचारी तैनात असूनही बाहेरून येणाऱ्या अथवा इतर कोणत्याच वाहनांची चौकशी करण्यात आली नाही.
पालिका प्रशासनाने देखील बंद काळात मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी दंडाचे पावती पुस्तक पोलीस ठाण्याचे रस्ते वाहतूक शाखेकडे देऊन आपल्या खंद्यावरील ओझे कमी केले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतचे बाब बनली आहे.