म्हसवड यात्रा होणार फ्लेक्समुक्त !
By admin | Published: November 21, 2014 09:11 PM2014-11-21T21:11:52+5:302014-11-22T00:20:26+5:30
सिद्धनाथ रथोत्सव : नगरपालिकेतर्फे बंदी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
म्हसवड : येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यात्रेचा रविवारी (दि. २३) मुख्य दिवस व रथोत्सव आहे. यादिवशी शहरात विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या डिजिटल फ्लेक्सला यावर्षी म्हसवड पालिकेने बंदी आणली आहे. तर काहींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
कोणतीही यात्रा, सण, उत्सव असो यानिमित्ताने फ्लेक्स लावण्याची स्पर्धाच असते. विविध राजकीय पक्ष, संघटना, मंडळे, युवा नेते आदींच्या फ्लेक्समुळे जागा व्यापल्या जातात. फ्लेक्सवरील छायाचित्र व मजकुरांमुळे अनेकदा वादावादीचे प्रसंग घडले आहेत. यामुळे म्हसवड पालिकेने यंदा फ्लेक्समुक्त यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेतला. पालिकेचा निर्णय न रुचल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधितांना कोणतेही उत्तर आलेली नाही. त्यामुळे फ्लेक्स बनवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या उत्तराची वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी)