म्हसवडचे कोरोना सेंटर हलविण्याचा डाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:52+5:302021-02-24T04:40:52+5:30
म्हसवड : माणच्या आरोग्य विभागाने म्हसवडकरांना विश्वासात न घेता लोकसहभागातून सुरू केलेले शासकीय कोरोना सेंटर इतरत्र हलवले होते. कोरोना ...
म्हसवड : माणच्या आरोग्य विभागाने म्हसवडकरांना विश्वासात न घेता लोकसहभागातून सुरू केलेले शासकीय कोरोना सेंटर इतरत्र हलवले होते. कोरोना सेंटरची खरी गरज कुठे आहे हे माहिती असूनही येथील सेंटर हलवण्याचा अधिकाऱ्यांचा डाव वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला. म्हसवडकर टीमने हा डाव उधळून लावल्याने वरिष्ठांनी येथील गरज ओळखून येथील सेंटर ‘जैसे थे’ ठेवून चपराक दिली.
याबाबत माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने व निवासी वसतिगृहात शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे शासकीय कोरोना सेंटर म्हसवड व परिसरात सुरू न करता म्हसवडपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगणापूर येथे सुरू केले. म्हसवड व परिसरातील नागरिकांची गैरसोय केली होती. म्हसवड परिसरातील बाधित रुग्ण उपचारासाठी चाळीस किलोमीटरवर जाणार का? पैसा असणारे बाधित रुग्ण अकलूज, पंढरपूर, सातारा, कऱ्हाड येथे जाऊन उपचार घेऊ लागले. ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे ते घरीच उपचार घेत होते. ही म्हसवड व परिसरातील लोकांची अडचण लक्षात घेऊन ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देऊन म्हसवड येथून शिंगणापूर येथे स्थालांतरित केलेले कोरोना सेंटर पुन्हा म्हसवड येथे सुरू करण्याची मागणी केली.
त्यानंतर चारच दिवसांत कोरोना सेंटर म्हसवड येथे सुरू करण्यात आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व संसर्ग झालेल्या सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी आम्ही म्हसवडकर टीमने जिल्हा आरोग्य विभागामार्फत अनुसूचित जातीजमाती व नवबौद्ध मुलांमुलीचे वसतिगृह येथे कोरोना सेंटर सुरू केले होते. या ठिकाणी हजारो बाधित विलगीकरण होऊन उपचार घेऊन बरे झाले होते. याठिकाणीच आम्ही म्हसवडकर ग्रुपच्यावतीने प्रथम ३१ बेडचे ऑक्सिजनसह डीसीएचसी लोकसहभागातून लोकवर्गणीच्या माध्यमातून उभे केले आहे. ते आजही सुरू आहे. शासकीय कोरोना सेंटर शिंगणापूरला स्थालांतरित झाल्यावरही म्हसवडकरांंना मोठा आधार असला तरी बाधित रुग्णांची अडचण लक्षात घेऊन शिंगणापूर येथे स्थालांतरित केलेले सीसी सेंटर पुन्हा म्हसवडला व्हावे यासाठी आम्ही म्हसवडकर ग्रुपचे राष्ट्रवादीचे म्हसवड शहराध्यक्ष व माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख राहुल मंगरुळे, पालिकेचे विरोधी पक्षनेते अकील काझी, कैलास भोरे, एल. के. सरतापे, प्रशांत दोशी, खंडेराव सावंत यांनी प्रयत्न केले.