महू धरण बाधित त्रस्त; प्रशासनाला फुटेना पाझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:00+5:302021-03-14T04:35:00+5:30
सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणार्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी शासकीय कार्यालयात आक्रोश ...
सातारा : कुडाळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणार्या महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी शासकीय कार्यालयात आक्रोश केला. पंधरा दिवसांत उर्वरित प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही धरणाचे काम बंद करू अशा इशाऱ्याचे निवेदन कार्यकारी अभियंता सातारा यांना दिले मात्र १५ दिवस उलटून गेले तरी प्रशासनाला पाजर फुटेना असे चित्र असून, आता धरणग्रस्त धरणाचे काम बंद पाडण्याच्या तयारीत आहेत.
कार्यकारी अभियंता धोम कालवे विभाग क्रमांक २ कृष्णानगर सातारा च्या अखत्यारितील हा विषय आहे. २० वर्ष झाले आमच्या जमिनी संपादित केल्या असून, अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला मिळाला नाही. अनेकांचे प्रश्न प्रलंबित असताना पाणी अडवले यामुळे २३ घरे पाण्याखाली गेली. सदर घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कृष्णा खोरे वगळता शासनाचा जबाबदार अधिकारी यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची मदतही केली नाही तर साधी चौकशी देखील करू शकले नाहीत. ज्यांना शेतजमीन मिळाले आहे ती व्यवस्थित मोजमाप नाही. त्यात अनेक त्रुटी आहेत. घराच्या भूखंडात अनेक अडचणी आहेत. काही सुधारणा जमीन मिळणे बाकी आहे. काहीना खडकाळ जमिनी मिळाल्याने त्यांनी बदली प्रस्ताव केला आहे. त्यांनी जमीन पसंत करून जमिनी मिळाल्या नाहीत. या सर्व प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. ज्यांना पर्यायी निवारा शेड दिले आहे त्यामध्ये पाणी आहे. त्यात राहणे शक्य नाही. ज्या कुटुंबाच्या घराची वीज खंडित केली आहे त्यांना रात्रीचे घरात राहणे अवघड झाले आहे. याबाबत सर्व खात्यांना आमच्या प्रश्नांची माहिती असूनही पाणी अडवून प्रकल्पग्रस्तांचे जगणे अवघड केले आहे.
मागण्या.....
* प्रकल्पग्रस्त कोट्यातून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
*पुनर्वसित ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील खास बाब म्हणून घरे बांधून मिळावित.
*खातेदारांना खडकाळ व नापीक जमिनींचे बदली प्रस्ताव विचार करून तातडीने पिकाऊ जमीन देण्यात यावयात.
* धरणग्रस्त दाखला सुलभतेने मिळावा.
*संकलन दुरुस्तीच्या कामाना होत असलेला विलंब थांबवावा व संकलन दुरुस्ती त्वरित करावी.
* खातेदारांना शेतजमीन, घरांसाठी भूखंड भेटला नाही त्याना त्वरित भूखंड मिळावा.
* ज्यांना शेतजमीन मिळाली आहे परंतु कब्जे पट्टीवर हद्द नसल्यामुळे ताबा नाही त्यांना फेरमोजणी करून मिळावी.
* ज्यांना शेतजमिनीवर जाण्याचा अडचण आहे त्यांना रस्ता मिळावा.
* काहींना जमिनी मिळाल्या परंतु मूळ मालक दमदाटी करून ताबा देत नाही त्यांना त्या मिळाव्यात.