येरळा तलावात स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:11 PM2018-01-03T23:11:36+5:302018-01-03T23:12:21+5:30
वडूज : खटाव तालुक्यातील येरळवाडी व सूर्याचीवाडी येथील मध्यम प्रकल्पावर वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्षी मुक्कामास आल्याने किलबिलाट वाढला आहे. तसेच तलाव परिसरात पक्ष्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात दिसत असून, सकाळी व सायंकाळी या पाहुण्यांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले येरळा तलावाकडे वळू लागली आहेत. मात्र, अद्यापही फ्लेमिंगोची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
येरळवाडी मध्यम प्रकल्पात यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने अनेक स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. सध्या तलाव चित्रबलाक, करकोचा, कांडेसर, स्पून बिल, काळा शराटी, पान कावळा, खंड्या, कवड्या, कवड्या तुतारी, शेकाट्या, जांभळी पाणकोंबडी, चक्रवाक, नदीसुरय, सुतारपक्षी, ग्रे हेरॉन, चांदवा, कोतवाल आदी पाहुण्यांनी बहरला आहे. हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांहून पक्षीप्रेमी तलाव परिसरात दाखल होत आहेत. पक्ष्यांच्या हालचाली पाहण्यासाठी सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे.
दरम्यान, या सर्वांपेक्षा देखणा फ्लेमिंगो (रोहित, अग्निपंख) या परदेशी पाहुण्याची पक्षीप्रेमी वाट पाहत आहेत. गत आठवड्यात सुमारे १०० ते १५० पक्ष्यांचा थवा येरळवाडी तलावावर घिरट्या घालून गेला असल्याचे स्थानिक गुराख्यांनी सांगितले.
मात्र, येरळवाडीत भरपूर पाणीसाठा असल्याने या पक्षांना खाद्य खाण्यासाठी व बसण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नाही. त्यामुळे हे पक्षी परतले असल्याचा अंदाज त्यांनी व पक्षीप्रेमींनी व्यक्त केला.
दरम्यान, दरवर्षी येरळवाडी तलावात फ्लेमिंगो पक्षी येत असतात. त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीप्रेमीही हजेरी लावतात. सध्या फ्लेमिंगो पक्षी आलेले नसल्याने काहीसे निराशेचे वातावरण आहे.
दीडशे फ्लेमिंगोचा थवा...
खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीच्या आगमनाबरोबर रंगाने गुलाबी असणाºया फ्लेमिंगोच्या (रोहित) आगमनाची प्रतीक्षा पक्षीमित्र करीत आहेत. खटाव तालुक्यातील येरळवाडी तलाव परिसरात फ्लेमिंगोची मुक्कामाची आवडती ठिकाणे आहेत. या तलावात मुबलक व पुरेसा पाणीसाठ्यासह खाद्य उपलब्ध असल्याने पक्षीमित्रांत आनंदाचे वातारणात आहे. यातील कोणत्या ठिकाणी परदेशी पाहुणे उतरणार? याची उस्तुकता त्यांना लागून राहिली आहे. सुमारे दीडशे फ्लेमिंगोचा थवा सुरक्षित पाणथळाच्या शोधात असल्याचे नुकतेच आढळून आले आहे.