ST कर्मचा-यांचं आंदोलन : सातारा बसस्थानकात आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठी हल्ला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:55 PM2017-10-20T14:55:35+5:302017-10-20T15:54:57+5:30
सातारा बसस्थानकात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून फाटकावर आडव्या लावलेल्या एसटी बसेस पोलिसांनी हलविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या बसेसच्या चाकाची हवा सोडणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पांगविताना पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला.
सातारा : एस. टी. संपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी सातारा बसस्थानकात कर्मचारी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. खासगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून फाटकावर आडव्या लावलेल्या एसटी बसेस पोलिसांनी हलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या बसेसच्या चाकाची हवा सोडणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पांगवताना पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला.
दरम्यान, दर अर्धा तासाला सातारा ते पुणे तसेच दर एक तासाला मुंबई, सोलापूर, सांगली अन् कोल्हापूरकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सातारा विभाग नियंत्रकांकडून देण्यात आली. परिवहन महामंडळाच्या नियमावलीनुसारच तिकीट दराचे नियोजन बसस्थानकात केले जाणार आहे.
संपाच्या काळात गेल्या चार दिवसांपासून खासगी वाहनांची वर्दळ वाढली असली तरी सातारा बसस्थानकात यांना प्रवेश नाही. मात्र, सांगली बस स्थानकाच्या फलाटावर जणू एसटी बसेस प्रमाणे उभारलेल्या काळ्या पिवळ्या वडाप गाडय़ांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. साताऱ्यातही वाहने आत पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याला आंदोलनकर्त्यांनी कडाडून विरोध केला.
संपाच्या चौथ्या दिवशीही सातारा बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण होते. एसटी बसेस बंद असल्यामुळे खाजगी गाड्या भरभरून प्रवासी पुण्या-मुंबईकडे निघाले आहेत. अशावेळी बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहनांना प्रवेश देण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला. कर्मचाऱ्यांनी फाटकावर एसटी बसेस आडव्या लावल्या आहेत. तरीही पोलिसांनी या बसेस हलविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या बसेस हलविता येऊ नये म्हणून चाकाची हवा सोडण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला. तेव्हा संतप्त कर्मचाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अन् परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने निषेधाच्या घोषणा दिल्या.