दूध व्यवसाय पुन्हा एकदा संकटाच्या भोवऱ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:57+5:302021-05-17T04:37:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आसू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी स्थिर झालेला दूध व्यवसाय पुन्हा एकदा संकटात येऊ लागला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आसू : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी स्थिर झालेला दूध व्यवसाय पुन्हा एकदा संकटात येऊ लागला आहे. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, दुधाच्या दरात प्रतिलीटर दोन रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे दूध व्यावसायिक चिंतेत पडला आहे.
आता कुठेतरी दूध उत्पादकाला चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली होती. परंतु कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत दूध उत्पादकावर मोठे संकट आले आहे. दूधदर तब्बल तीस रुपयांवरून कमी होऊन पंचवीस रुपयांवर स्थिरावला होता, तर त्यामध्ये अजून दोन रुपये कमी होऊन तेवीस रुपयांवर आल्याचे पाहायला मिळत आहे. हे दिवस असेच राहिले तर छोटे-मोठे दूध व्यावसायिक संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. दूध उत्पादकाला प्रति लीटर २३ रुपये दर मिळत आहे, तर याउलट दूध उत्पादकांना एक लीटर दुधाचे उत्पादन घेण्यासाठी सर्वसाधारणपणे ३० ते ३२ रुपये खर्च येत आहे. मात्र हेच दूध सद्यस्थितीला ते २३ रुपये प्रतिलीटर विकले जात आहे. म्हणजेच दूध उत्पादकांना प्रतिलीटर १० ते १२ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
मागील दोन महिन्यांत दूध दरात वाढ झालेली पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भरमसाट किमतीला गाई-म्हशीची खरेदी करून दूध उत्पादनास सुरुवात केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दूध उत्पादक संकटात सापडला आहे. भरमसाट किमतीला गाईंची खरेदी चारा उत्पादनासाठी केलेला मोठ्या प्रमाणात खर्च तसेच पशुखाद्याच्या किमती वाढ या सर्वांचा विचार करता दूध दरात घट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याचबरोबर त्याला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे सरकारने आता तरी यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चौकट..
दुधाचा खरेदी व विक्री दर
खासगी कंपन्यांनी दूध खरेदी दर तब्बल तीस रुपयांवरून तेवीस रुपयांवर आणले आहेत. मात्र, दुधाच्या पिशवीच्या विक्रीदरात कोणत्याही प्रकारची घट झाल्याचे पाहायला मिळत नाही तर दूध दर कमी होण्यामागे लॉकडाऊनचे कारण पुढे केले जात आहे.
(चौकट)
लॉकडाऊनमुळे दुधाची मागणी कमी खर्च जास्त
लॉकडाऊन झाल्याने दुधाची मागणी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद झाले आहेत. सर्वाधिक जास्त दूध पिशवीची मागणीही हॉटेल व्यावसायिकांची असते. हॉटेल व्यवसाय बंद असल्याने दुधाची मागणी कमी झाल्याचे दिसत आहे.
चौकट..
पशुखाद्य दरात वाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूध दरात घट झाल्याचे पाहायला मिळत असतानाच पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्य दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच पशुखाद्य कंपन्यांनी सरासरी पर बॅग ४० ते ७० रुपये एवढी दरात वाढ केल्याचे दिसून येत आहे.
(कोट.)
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षीचा दूध उत्पादनात मोठा तोटा सहन केला आहे. आता कुठेतरी दोन महिने परिस्थिती सुधारली की लगेचच कोरोनाचे व लॉकडाऊनचे कारण देत दुधाचे दर परत कमी केले आहेत. दूध व्यवसाय करायचा तरी कसा, असा प्रश्न पडत आहे.
- राहुल कुंभार, दूध उत्पादक, आसू, ता. फलटण