दुधाला भाव येईना; गाय विकली जाईना!
By admin | Published: December 6, 2015 10:55 PM2015-12-06T22:55:23+5:302015-12-07T00:31:07+5:30
व्यावसायिकांची परवड कोण थांबवणार? : २६ रुपये लिटरचा दर थेट १९ वर येऊन कोसळला...--दूध का दूध.. कष्टावर पाणी
रशीद शेख -- औंध--शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसायाने मागील काही वर्षांत बस्तान बसविले होते; मात्र काही दिवसांपासून सातत्याने दूध दराच्या चढ-उताराचे या व्यवसायाला जणू ग्रहणच लागल्याचे चित्र आहे. जागतिक उत्पादनात १३ टक्के हिस्सा असणाऱ्या या व्यवसायाची परवड कोण थांबविणार? असा प्रश्न आहे. दरम्यान, दुधाचा २६ रुपयांचा दर १९ वर येऊन कोसळला आहे. दि. २६ नोव्हेंबरला देशात राष्ट्रीय दुग्धदिन साजरा केला गेला. अन् बरोबर १ डिसेंबरपासून दूध खरेदीच्या दरात कपातीचा निर्णय झाला. जगातील सर्वात मोठा दुग्धोत्पादन करणारा देश अशी भारताची ओळख आहे. जगातील एकूण दुग्ध उत्पादनातील १३ टक्के भारताचा हिस्सा आहे. शेतकऱ्यांची जीवनशैली व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्धव्यवसायाकडे वळा असे आवाहनही केले जाते ; पण प्रत्यक्षात मात्र दूध उत्पादकांची परवड कोण थांबविणार? असा प्रश्न आहे.दूध दराच्या चढ-उतारामुळे काही महिन्यांपूर्वी २६ रुपये लिटर मिळणारा दर आता १९ ते २० रुपयांवर येऊन ठेपल्याने दूध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. गायीच्या १ लिटर दूधनिर्मितीचा सरासरी विचार करता, वैरण, खाद्य, औषधे, मजुरी याचा खर्च वजा केला असता हाती काहीच शिल्लक राहत नाही. शेतकऱ्यांनी लाखोंचे कर्ज काढून गोठे बांधले आहेत. परराज्यातून दुधाळ गायी, म्हशी आणल्या असून, दराच्या संगीतखुर्चीमुळे दूध उत्पादकांच्या आशेवरच पाणी फिरले आहे.
सद्य:स्थितीत ५ फॅटला २१ वरून २० रुपयांवर दर मिळतो. तर ४ फॅटला १९ रुपये मिळतो. बहुतांश शेतकऱ्यांना ४ फॅटनेच दर मिळतो. दूध पावडरवर आलेल्या निर्यात बंदीमुळे ज्या किमतींना गायी विकत आणल्या त्यांचा बाजारभाव पण ढासळल्याने धरलं तर चावतंय.. अशी परवड शेतकऱ्यांची झाली आहे.
८० हजारांची गाय ३५ हजारांत...
मागील वर्षी गायी, म्हशी ज्या दराने शेतकऱ्यांनी खरेदी केल्या, त्या आता विक्रीस काढल्या तरी निम्म्या दरानेही जाणार नाहीत. मागील वर्षी ८० ते ९० हजारांना घेतलेली गाय आज बाजारात ३५ ते ४० हजारांना मागत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
चारा, पशुखाद्य, देखभालीचा खर्च व दुधाचा मिळणारा दर यामुळे आमच्या हातात नफा म्हणून काहीच शिल्लक राहात नाही. यामुळे याबाबत शासनाने दूध उत्पादकांसाठी चांगले निर्णय घेण्याची गरज आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आता अच्छे दिनाची प्रतीक्षा आहे.
- धनाजी जाधव, पशुपालक, औंध