प्रशासनाने कान टोचताच लाखोंची बिले झाली कमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:40+5:302021-05-28T04:28:40+5:30
सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या ४७ रुग्णालयांनी बिले वाढवून लावली होती. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने तपासणी ...
सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या ४७ रुग्णालयांनी बिले वाढवून लावली होती. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर तब्बल २० लाख ५६ हजार ७४६ रुपयांचे जादा बिल आकारल्याचे समोर आले आहे. हे पैसे संबंधित नातेवाइकांना परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांचे देयक पथकामार्फत तपासण्यात येऊन एकूण १८३ रुग्णांची जादा आकारणी करण्यात आलेली २० लाख ५६ हजार ७४३ इतकी रक्कम परत करण्याचे आदेश काढण्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेशित केले आहे.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देणे, याबाबत शासनाने वेळाेवेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत आहे अगर कसे? तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे बाबनिहाय वैद्यकीय उपचारांचे देयक योग्य आहे अगर कसे, याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील ६३ हॉस्पिटलसाठी ६३ ऑडिटर व तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामार्फत एकूण ६३ हॉस्पिटलमधील ४ हजार ५७९ एवढ्या रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये हॉस्पिटलकडून रु. २२ कोटी ६२ लाख २० हजार २३९ इतकी रक्कम आकारण्यात आली होती.
८० बेड राखीव ठेवण्याचे आदेश
सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना २८ हॉस्पिटलमध्ये सुरू असून, या हॉस्पिटलमध्ये एकूण बेडच्या ८० टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
कोरोनावर उपचार करणारी एकूण रुग्णालये : ६३
जादा बिल आकारणी करणारी रुग्णालये : ४७
जिल्ह्यातून आलेल्या तक्रारी : १८३
शासनाने घालून दिलेले दर असे
आयसीयू विथ व्हेंटिलेटर : ९०००
आयसीयू विना व्हेंटिलेटर : ७५००
जनरल वाॅर्ड : ४०००