पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:36+5:302021-06-03T04:27:36+5:30

मान्सूनपूर्व पावसाने कऱ्हाड शहरासह तालुक्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस मोठ्या स्वरूपाचा पाऊस ...

Millions lost due to rains | पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

पावसाच्या तडाख्यात लाखोंचे नुकसान

Next

मान्सूनपूर्व पावसाने कऱ्हाड शहरासह तालुक्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी पाऊस झाला. मात्र, पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे नुकसान टळले. मात्र, मंगळवारी दुपारी दोन तास धुवाँधार पाऊस होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. तसेच नाले तुंबल्यामुळे पाणी अनेक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये शिरले. शहरातील दत्त चौक, शाहू चौक, विजय दिवस चौक, कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप चौक परिसरात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच किराणा, धान्य दुकान, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, मोबाईल शॉपी, सलूनमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्य भिजून व्यावसायिकांचे नुकसान झाले.

कऱ्हाड हॉस्पिटलच्या तळमजल्यात कोरोना वॉर्ड आहे. या वॉर्डमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी गेले. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली. पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केली. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. कृष्णा रुग्णालयातही तळमजल्यांमध्ये पाणी गेल्यामुळे नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसभर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. त्यामुळे दुकानांमध्ये पाणी गेलेल्या काही व्यावसायिकांनी दुकाने उघडून स्वच्छतेचे काम हाती घेतले.

- चौकट

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

कऱ्हाड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळपासून तालुक्यात गावकामगार तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले. या पावसाने शेतीचे नुकसान झाले नाही. मात्र, काही ठिकाणी झाडे मोडून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

- चौकट

खासदारांच्या निवासस्थानाबाहेर तळे

खासदार श्रीनिवास पाटील हे गोटेगावच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. त्याठिकाणी त्यांचे निवासस्थान असून मंगळवारी झालेल्या पावसाने या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. खासदारांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी होते.

फोटो : ०२केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाडातील दत्त चौकात तळमजल्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बुधवारी काही व्यावसायिकांनी वीज पंपाचा वापर केला.

फोटो : ०२केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडातील सखल भागात बुधवारीही पावसाचे पाणी साचून राहिले होते.

Web Title: Millions lost due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.