मसूर येथे भिशीतून लाखोंचा गंडा
By Admin | Published: December 6, 2015 12:02 AM2015-12-06T00:02:03+5:302015-12-06T00:02:36+5:30
पोलीस अधीक्षकांकडे धाव : मारहाणीच्या, अॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या धमक्यांमुळे दहशत
सातारा : कऱ्हाड तालुक्यातील मसूरमध्ये भिशीच्या माध्यमातून अनेकांना लाखोंचा गंडा घातला गेल्याचे प्रकरण उजेडात आले असून, अशा लोकांकडूनच फसवणूक झालेल्या ग्रामस्थांना चौकात मारण्याच्या, अॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे त्यांच्यात दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीडित ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना शनिवारी निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भिशीच्या माध्यमातून मसूर व परिसरातील जनतेची आर्थिक फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यासंबंधी मसूरमधील किशोर मेघराज शहा यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली होती. मात्र, यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक गुन्हे उघडकीस येतील, असे शहा यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या आरोपींच्या धमक्यांमुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
भर चौकात मारण्याची धमकी
मसूर येथील गणेश मारुती शिवदास, इम्तियाज (इमाम) गफार मुल्ला, कालगाव, ता. कऱ्हाड येथील प्रवीण नानासो पवार या तिघांनी मिळून मसूर येथे पाच वर्षांपूर्वी भिशी सुरू केली होती. त्यात ४५ सदस्य होते. त्यामध्ये आपणास सदस्य करून घेतले होते. दरमहा दोन हजार रुपयांप्रमाणे नियमित हप्ते भरून आपले ९० हजार रुपये झाले होते; परंतु या त्रिकुटाने सतत बनवाबनवी करत आपणास त्यापैकी केवळ ३५ हजार रुपये परत केले. त्यानंतर त्यांनी दरमहा पाच हजार हप्त्याची दुसरी भिशी सुरू केली. पहिले राहिलेले ५५ हजार (११ हप्ते) आपण यामध्ये जमा करतो. बाकी सात हप्ते भरा, असे त्यांनी सांगितले. पहिले पैसे अडकल्यामुळे नाइलाजास्तव आपण दरमहा पाच हजारांप्रमाणे पुढील सात हप्ते भरले. असे ९० हजार रुपये त्यांच्याकडे अडकले असून, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. ‘चौकात मार खायचा आहे का? पैसे मागितल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी दिली जात आहे.