मनोमिलन अन् आघाडीसुध्दा !
By Admin | Published: July 24, 2015 10:10 PM2015-07-24T22:10:48+5:302015-07-25T01:13:30+5:30
सोयीचे राजकारण : नेत्यांचेही कानावर हात; म्हणे... तुमचं तुम्ही बघा !
प्रमोद सुकरे - कऱ्हाड तालुक्याचं राजकारण प्रत्येक निवडणुकीत बदलताना पाहायला मिळते. सत्तेसाठी नेत्यांची वेगळी समीकरणं पाहायला मिळतात. त्याला मनोमिलन, मैत्रिपर्व अशी गोंडस नावंही दिली जातात; पण यातून कार्यकर्त्यांनीही आता बरेच शहाणपण घेतले आहे. त्याचेच प्रत्यंतर आता गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत येत असून, ग्रामस्थांनी काही ठिकाणी नव्याने मनोमिलन केलेलं दिसतंय तर काही ठिकाणी मैत्रिपर्व जपल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही गावांत मतभेद बाजूला ठेवून आघाडीही झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायती ! ही पहिली पायरी आपणच यशस्वीपणे पार पाडावी यासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता अर्ज माघारीची मुदत संपल्याने उमेदवारांसह स्थानिक नेत्यांनी जोर बैठकांची गती वाढविली आहे. ४ आॅगस्टला ते एकमेकांना प्रत्यक्ष भिडणार आहेत. पण, गावच्या आखाड्यातील ही कुस्ती जिंकण्यासाठी सोयीचे राजकारण करत गावागावांत नवे मैत्रिपर्व, मनोमिलन पाहायला मिळाले आहे.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतोच मुळी ! कऱ्हाड तालुक्यात तर प्रत्येक निवडणुकीला राजकारणाच वेगळे चित्र पाहायला मिळू लागले आहे. त्याला ग्रामपंचायत निवडणूकाही अपवाद नाहीत. राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहिते अन् भोसले गट सात वर्षांपूर्वी एकत्र आले. त्याला ‘मनोमिलन’ असं नाव देण्यात आलं. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विलासराव पाटील-उंडाळकरांच्या विरोधात सर्वजण एकत्रित आले. त्याला ‘महाआघाडी’ असे संबोधले गेले. तर विधानसभा निवडणुकीतील घडामोडींनंतर विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले गट पुन्हा एकत्र आले. त्याला ‘मैत्रिपर्व’ म्हटलं गेलं. या साऱ्या घडामोडींमुळे गावागावांत दोन नव्हे तर तीन, चार, पाच असे गट तयार झाले आहेत. पण, प्रत्येक निवडणुकीत नेते वेगवेगळ्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालत असतील तर ग्रामपंचायत निवडणुकीला आपण त्याचे अनुकरण केले तर बिघडले कुठे? असे म्हणत निवडणुकीसाठी नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत.
तालुक्यात सध्या ९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. ४ आॅगस्टला मतदान होणार आहे. तर ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. मनोमिलन, मैत्रिपर्व अन् आघाडीमुळे बहुतांशी गावात अपवाद वगळता दुरंगीच लढती होत आहेत.
पाच गावांचा बिनविरोधचा ‘झेंडा’
खरंतर गावाची एकी गावाच्या विकासाला गती देऊ शकते; पण हे लक्षात कोण घेतो? पण, कऱ्हाड तालुक्यातील शेवाळेवाडी, भुयाचीवाडी, भरेवाडी, भोळेवाडी अन् पाचुंदच्या ग्रामस्थांना ते पटलंय म्हणून तर त्यांनी बिनविरोधचा झेंडा फडकविला आहे.